वुहानमधील बळींच्या संख्येत १२९० ने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:43 PM2020-04-17T23:43:01+5:302020-04-17T23:43:14+5:30
चीनमध्ये एकुण बळी ४६००वर; ट्रम्प यांच्या आरोपानंतर उचलले पाऊल
बिजिंग : कोरोना साथीचे उगमस्थान असलेल्या चीनमधील वुहान शहरातल्या बळींच्या संख्येत सुधारणा करण्यात आली असून तो आकडा १,२९०ने
वाढला आहे. त्यामुळे वुहानमधील एकुण बळींचा आकडाही ३,८६९ वर पोहोचला आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाच्या एकुण बळींची संख्या ४६००पेक्षा अधिक झाली आहे.
चीनमधील कोरोनाचे नवे रुग्ण व बळींची नोंदणी करण्यात स्थानिक प्रशासनाकडून काही चुका झाल्या. काही वेळा उशीरा नोंदणी झाली किंवा नोंदणी करण्याचे राहून गेले होते. आता ही सर्व आकडेवारी तपासून त्यात सुधारणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची खरी संख्या चीन जगापासून दडवून ठेवत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला होता. जगभरात उच्छाद मांडणारा कोरोनाचा विषाणू चीनमधील एखाद्या प्रयोगशाळेतील होता का याचीही त्या देशाने चौकशी करावी, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली होती. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या साथीमागचे रहस्य त्या देशाने सर्व जगाला सांगितले पाहिजे अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले होते. त्यानंतर जागे झालेल्या चीनने कोरोना बळींच्या आकडेवारीत सुधारणा करण्याचे पाऊल उचलले आहे. चीनच्या सीसीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, वुहान शहरातील बळींची संख्या वाढल्यामुळे देशभरातील एकुण बळींची संख्या आता ४,६००पेक्षा अधिक झाली आहे. वुहानमधील कोरोना रुग्णांच्या संख्येतही सुधारणा झाली असून तो आकडा ३२५ने वाढला आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेवर कुरघोडी करण्याचा चीनचा प्रयत्न
कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात अमेरिकेपेक्षा अधिक यश आपल्याला आले आहे असे दाखविण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे असा आरोप अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही केला होता. चीन कोरोना बळी व रुग्णांची खरी आकडेवारी जगापासून लपवत आहे या अमेरिकेने केलेल्या आरोपाला वुहान शहरातील बळींच्या संख्येत झालेल्या सुधारणेने पुष्टीच मिळाली आहे असा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केला आहे.