नर्सचा विक्षिप्तपणा; 20 रुग्णांना स्लो पॉयजन देऊन संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:32 PM2018-07-12T12:32:57+5:302018-07-12T12:33:01+5:30
दोन शवविच्छेदन अहवालांमुळे नर्सचं भांड फुटलं
टोकियो: जपानमध्ये एका नर्सनं विषारी औषध देऊन 20 वयोवृद्ध रुग्णांची हत्या केली आहे. आपल्या कामाच्या वेळेत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये, त्यामुळे आपल्याला कोणतंही स्पष्टीकरण द्यावं लागू नये, यासाठी नर्सनं 20 जणांना इंजेक्शनमधून विषारी रसायनं दिल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
जपानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, योकोहामाच्या ओगुची रुग्णालयात जुलै ते सप्टेंबर 2016 या कालावधीत 48 रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबर 2016 मध्ये रुग्णालयात मृत पावलेल्या सोजो निशिकावा (88) आणि नोबुओ यामकी (88) यांच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब आढळून आली. या दोघांच्याही शरीरात विषारी रसायन आढळून आलं. यानंतर पोलिसांनी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असलेल्या अयूमी कुबोकीला (31) ताब्यात घेतलं. तिनं दोघांच्याही हत्येची कबुली दिली. आपल्या कामाच्या वेळेत रुग्ण दगावू नये, यासाठी अयूमीनं इंजेक्शनमधून त्यांच्या शरीरात विषारी रसायन सोडलं होतं. यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. आपण आतापर्यंत 20 जणांना अशाप्रकारे मारल्याची माहितीदेखील तिनं पोलिसांना दिली.
आपल्या शिफ्टमध्ये एखादा रुग्ण दगावल्यास संपूर्ण परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल, या विचारानं अयूमी कुबोकी रुग्णांना बेंजलकोनियम क्लोराइड नावाचं रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णांना द्यायची. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू एका ठराविक वेळेनंतर व्हायचा. रुग्णांच्या कुटुंबीयांचा सामना करावा लागू नये, रुग्णालय प्रशासनाला उत्तर द्यावं लागू नये, यासाठी अयूमी हे सर्व करत होती. दोन रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालांमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि ती पकडली गेली.