कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून जिवे मारलं जातंय; न्यूयॉर्कमधल्या नर्सच्या दाव्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 11:06 AM2020-04-29T11:06:34+5:302020-04-29T11:16:16+5:30
न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १२ हजार बळी; हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप
न्यूयॉर्क: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून याचा सर्वात मोठा उटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जवळपास ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. त्यातच न्यूयॉर्कमधील रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकेनं केलेल्या एका दाव्यानं जगभरात खळबळ माजली आहे. कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवून त्यांना जिवे मारलं जात असल्याचा दावा एका परिचारिकेनं केला आहे.
कोरोना संकटात रुग्णांची सुश्रूषा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या परिचारिकेनं तिचा धक्कादायक अनुभव मैत्रिणीच्या माध्यमातून जगापुढे आणला आहे. न्यूयॉर्कच्या रुग्णालयामधला प्रकार एखाद्या हॉरर चित्रपटात शोभण्यासारखा असल्याचं तिनं म्हटलं आहे. कोरोनाचं संकट गंभीर आहेच. मात्र न्यूयॉर्कमधल्या रुग्णालयात ज्या पद्धतीनं हे संकट हाताळलं जातं आहे, ते जास्त गंभीर असल्याचं परिचारिकेनं म्हटलं आहे. 'डेली मेल'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात काम करत असलेल्या परिचारिकेनं रुग्णांच्या नातेवाईकांना अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तुमचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींपैकी कोणालाही कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केलं जाणार असेल, तर त्यांना व्हेंटिलेटर ठेवलं जाणार नाही, याची पुरेशी खात्री करून घ्या, असं कळकळीचं आवाहन परिचारिकेनं तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून केलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आलं आहे.
'मी तिचा (परिचारिकेचा) आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. तिनं मला सांगितलेल्या धक्कादायक घटना मी तुम्हाला सांगत आहे. न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरू हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं असं तिला वाटतं. तिथे (रुग्णालयात) सुरू असलेला हलगर्जीपणा तिनं याआधी कधीही पाहिलेला नाही. कोणालाच रुग्णांची चिंता नाही. ते अतिशय थंडपणे काम करत आहेत आणि त्यांना रुग्णांची जराही चिंता नाही. एका आंधळ्यानं दुसऱ्याला दिशा दाखवावी, तसा प्रकार तिथे सुरू आहे,' अशी धक्कादायक माहिती परिचारिकेनं तिच्या मैत्रिणीला दिली आहे.
'रुग्ण आजारी आहेत. मात्र त्यांना रुग्णालयाकडून मदत केली जात नाही. त्यांची हत्या केली जात आहे,' असं परिचारिकेच्या मैत्रिणीनं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 'परिचारिका म्हणून काम करत असलेल्या माझ्या मैत्रिणीनं रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकारासाठी थेट हत्या हा शब्द वापरला. कोरोनानं थैमान घातलेल्या न्यूयॉर्कला मदत करण्याच्या हेतूनं मैत्रीण तिथे गेली होती. मात्र तिथे तिनं पाहिलेला प्रकार धक्कादायक आहे,' असा खळबळजनक दावा व्हिडीओमधून करण्यात आला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ५९ हजारहून अधिक जणांचा बळी गेला असून यातले १२ हजारपेक्षा अधिक जण न्यूयॉर्कमधले आहेत.
"डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम झालं नाही"
'ही' पक्षपाती आणि वादग्रस्त विधानं नवीन नाहीत; अमेरिकन सरकारी संस्थेचा रिपोर्ट भारताने फेटाळला
'राहुल गांधींकडून निर्लज्जपणे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू'