राष्ट्राध्यक्षपदाची मॅकरॉन यांना शपथ
By Admin | Published: May 15, 2017 12:14 AM2017-05-15T00:14:02+5:302017-05-15T00:14:02+5:30
इमॅन्युअल मॅकरॉन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रविवारी शपथ घेतली. देशाने आशेची निवड केली असून आपण युरोपियन युनियनमध्ये पुन्हा प्राण फुंकून तिला
पॅरिस : इमॅन्युअल मॅकरॉन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रविवारी शपथ घेतली. देशाने आशेची निवड केली असून आपण युरोपियन युनियनमध्ये पुन्हा प्राण फुंकून तिला प्रगतिपथावर नेऊ, असा दुर्दम्य विश्वास त्यांनी शपथविधीनंतर व्यक्त केला.
अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव करणाऱ्या मॅकरॉन यांनी फ्रान्स्वा ओलांद यांच्याकडून सत्तेची सूत्रे स्वीकारली. एलिसी प्रासादात ओलांद यांनी मॅकरॉन यांचे उत्साहपूर्वक स्वागत केले. उभय नेत्यांत बंदद्वार चर्चा झाली. यावेळी ओलांद यांनी फ्रान्सच्या अण्वस्त्रांचा कोड त्यांना सांगितला. विशेष म्हणजे ओलांद यांनी मॅकरॉन यांना सर्वांत आधी आपल्या सल्लागारपदी आणि नंतर अर्थमंत्रीपदी नेमले होते.
शपथविधी सोहळ्यानंतर बोलताना मॅकरॉन म्हणाले की, फ्रान्सच्या जनतेने आशेची निवड केली आहे. ब्रिटन बाहेर पडल्यामुळे युरोपियन युनियनला धक्का बसला आहे. त्यातून युनियनला सावरून प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण जोर लावणार आहोत. मॅकरॉन फ्रान्सचे सर्वांत तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत. (वृत्तसंस्था)