ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी
By admin | Published: October 31, 2016 01:56 PM2016-10-31T13:56:39+5:302016-10-31T14:04:21+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदाच दिपप्रज्वलन करुन दिवाळी साजरी केली
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 31 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील दिवाळी साजरी केली आहे. व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदाच दिपप्रज्वलन करुन ओबामांनी दिवाळी साजरी केली. आपल्यानंतर येणारे राष्ट्राध्यक्षही ही परंपरा कायम राखतील, अशी अपेक्षा ओबामांनी यावेळी व्यक्त केली.
ओबामा यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून फोटो शेअर केला असून आपल्या भारत दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ओबामांनी 2009 मध्ये सर्वात प्रथम व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणारे ओबामा अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरले होते. त्यांनी व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमध्येही दिव्यांची आरास केली. यावेळी अमेरिकन आणि भारतीय कर्मचारी उपस्थित होते.
'व्हाईट हाऊसमध्ये 2009ला दिवाळी साजरी केल्याने माझ्या मनात सन्मानाची भावना होती. मिशेल आणि मी भारत दौ-यावर असताना भारतीयांकडून झालेलं स्वागत आम्ही कधीच विसरणार नाही. दिवाळीनिमित्त आमच्यासोबत केलेला डान्सही कधीच विसरणार नसल्याचं', ओबामांनी म्हटलं आहे.
‘यावर्षी ओव्हल ऑफिसमध्ये पहिल्यांदाच दीप प्रज्वलित करण्याचा सन्मान मला मिळाला. अंधारावर नेहमी प्रकाशाचा विजय होतो, याचं हा दिवा प्रतीक असतो. माझ्यानंतर येणारे अध्यक्ष ही परंपरा कायम राखतील’, अशी आशा ओबामांनी व्यक्त केली आहे. ओबामांनी कुटुंबियांच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.