ओबामांना नाही जमलं ते ट्रम्पनी करुन दाखवलं
By admin | Published: April 7, 2017 10:37 AM2017-04-07T10:37:35+5:302017-04-07T13:06:08+5:30
सीरियातील हवाई तळावर हल्ला करण्याचा आदेश देऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांना जे जमले नाही ते करुन दाखवले.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 7 - सीरियातील हवाई तळावर हल्ला करण्याचा आदेश देऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांना जे जमले नाही ते करुन दाखवले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियातील बाशर असद सरकारला विरोध होता. त्यावरुन त्यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर तीव्र मतभेदही झाले. पण त्यांनी कधी थेट सीरियन सरकारच्या विरोधात कारवाईचा निर्णय घेतला नाही.
सीरियात इसिस विरोधातील लढाईत अमेरिकेचा सहभाग मर्यादीत होता. पण आता अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक राजकारण तापणार आहे. बाशर असद सरकारला रशिया आणि इराण या दोन देशांचा भक्कम पाठिंबा आहे. पण त्याचवेळी अमेरिका आणि युरोपातील प्रमुख देश असाद सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे या मुद्यावरुन जागतिक राजकारणात दोन गट पडणार असून, राजकारण अधिक तीव्र होणार आहे.
यात चीनची भूमिकाही महत्वाची राहील. चीन रशियाच्या बाजूने उभा राहिल्यास पेच आणखी वाढेल. सीरियात असद सरकारने आपल्याच नागरीकांवर रासायनिक हल्ला घडवून आणला. त्यामुळे खवळलेल्या अमेरिकेने सीरियातील शायरत तळावर 50 पेक्षा जास्त क्रूझ मिसाइल डागली.
सीरियन नागरीकांवर रासायनिक हल्ला करण्यासाठी ज्या शायरत हवाई तळाचा वापर झाला त्याच तळाला गुरुवारी रात्री अमेरिकेने लक्ष्य केले. भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असे ट्रम्प यांनी सांगितले. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले.