ओबामा रुग्णालयात
By admin | Published: December 8, 2014 01:47 AM2014-12-08T01:47:26+5:302014-12-08T01:47:26+5:30
घशाशी संबंधित तक्रारीवरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची रविवारी सीटी स्कॅन व फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली.
वॉशिंग्टन : घशाशी संबंधित तक्रारीवरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची रविवारी सीटी स्कॅन व फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली. यात त्यांना एसिड रिफ्लेक्सचा आजार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ओबामा २६ जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत; मात्र या भेटीत त्यांना मसालेदार पदार्थ दिले जाणार नाहीत.
घसा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर ओबामा (५३) यांना येथील रीड सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. रुनी एल. जॅक्सन यांच्या निगराणीखाली ओबामा यांच्या गळ्याची फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली. ओबामा २८ मिनिटे सैन्य रुग्णालयात होते. याआधी मेमध्ये ओबामा यांनी आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर जॅक्सन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ओबामांची प्रकृती स्थिर होती.
ओबामा दाम्पत्यावर चित्रपट
बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांच्या प्रेमकहाणीवर चित्रपट बनविला जाणार आहे. ‘साऊथ साईड विथ यू’ हा चित्रपट ओबामा दाम्पत्याच्या प्रेमकहाणीवर आधारित असेल. चित्रपटात विशेषत्वाने १९८९ च्या कडाक्याच्या उन्हात ओबामा यांनी शिकागो येथे झालेल्या पहिल्या भेटीत मिशेल यांचे मन जिंकल्याचा प्रसंग असणार आहे. (वृत्तसंस्था)