नरेंद्र मोदींच्या टिष्ट्वटकडे ओबामांनी केले दुर्लक्ष
By admin | Published: May 21, 2014 02:00 AM2014-05-21T02:00:41+5:302014-05-21T02:00:41+5:30
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छांवर आभार व्यक्त करणार्या टिष्ट्वटमध्ये सर्वांत शेवटी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव टाकले आहे
वॉशिंग्टन : भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छांवर आभार व्यक्त करणार्या टिष्ट्वटमध्ये सर्वांत शेवटी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव टाकले आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करत उभय देशांतील संबंध भविष्यातही चांगले राहतील, असा आशावाद ओबामा यांनी व्यक्त केला आहे. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध हे मजबूत आणि स्थायी स्वरूपाचे आहेत आणि भविष्यातही हे आणखी दृढ होतील, असा विश्वास ओबामांनी प्रकट केला. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एवढे मजबूत आणि कायमस्वरूपी आहेत की, टिष्ट्वटरमधील नामावलीत सर्वांत खाली उल्लेख झाला म्हणून चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. भारतासोबत दीर्घकाळापासून आमची भागीदारी राहिली आहे. भविष्यातही यात आणखी वाढ होईल.’ साकी यांना राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे नाव मोदी यांच्या प्राधान्यक्रमात सर्वांत शेवटी आल्यामुळे प्रशासन चिंताक्रांत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत आभार व्यक्त करताना मोदींनी ओबामा यांच्या नावाचा उल्लेख केला होता. (वृत्तसंस्था)