अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना संपवणारच - ओबामा
By admin | Published: September 11, 2014 11:58 AM2014-09-11T11:58:11+5:302014-09-11T12:05:17+5:30
अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे सांगत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचे समूळ उच्चाटन करु असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ११ - अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे सांगत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचे समूळ उच्चाटन करु असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. अमेरिकेच्या हवाई दल आणि सैन्याच्या माध्यमातून जिथेही आयएसआयएस असेल तिथून त्यांना संपवणारच असेही ओबामा यांनी म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष झाल्यानिमित्त बुधवारी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात दहशतवादविरोधी मोहीमेची रणनिती जाहीर केली. अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना कुठेच शरण मिळणार नाही हेच आमचे धोरण आहे असे सांगत आयएसआयएसला याचे परिणाम भोगावेच लागतील असे इशाराच त्यांनी दिला. आयएसआयएसला संपवण्यासाठी अमेरिका मोहीम राबवणार आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही वेळेची मर्यादा ठेवलेली नाही. पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आम्ही कोणताही विचार करणार नाही असे त्यांनी नमूद केले.
आयएसआयएस हे इस्लामी नाहीत. कोणताही धर्म निष्पापांचा जीव घ्या असे सांगत नाही. आयएसआयएसच्या अत्याचाराचा सर्वाधिक फटका मुस्लिमांनाच बसला असून ती एक दहशतवादी संघटनाच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आयएसआयएसविरोधातील मोहीमेसाठी अमेरिकेला जगातील आत्तापर्यंत ३७ देशांनी अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा या देशांमध्ये समावेश नाही.