ओबामांचे क्रेडिट कार्ड मशीनने नाकारले
By admin | Published: October 19, 2014 02:43 AM2014-10-19T02:43:33+5:302014-10-19T02:43:33+5:30
एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खिशात असल्यास खरेदीची चिंता कशाला? असे वाटत असले तरी अनेकदा समस्या उद्भवतात आणि हिरमोड होतो,
Next
वॉशिंग्टन : एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खिशात असल्यास खरेदीची चिंता कशाला? असे वाटत असले तरी अनेकदा समस्या उद्भवतात आणि हिरमोड होतो, असा अनुभव अनेकांना आला आहे. सर्वसामान्य लोकांच्याच वाटय़ाला असा अनुभव येतो, असे म्हणत असाल तर हा समज चुकीचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. 24 सप्टेंबर रोजी ओबामा संयुक्त राष्ट्राच्या दौ:यावर असताना न्यूयॉर्क शहरातील एका रेस्टॉरन्टमध्ये त्यांनी भोजन घेतले. बिल चुकते करण्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्ड पुढे केले; परंतु, ते स्वीकारण्यात आले नाही.
सुदैवाने पत्नी मिशेल सोबत होती. अखेर मिशेल यांनीच आपल्या क्रेडिट कार्डने बिल चुकते केले, अशी माहिती बराक ओबामा यांनीच ग्राहक वित्तीय संरक्षण विभागाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात दिली. याच कार्यक्रमात त्यांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि बनवेगिरीला आळा घालण्यासाठी नवीन उपाय घोषित केले. मी क्रेडिट कार्डचा वापर कमी करीत असल्याने माङो कार्ड स्वीकारले गेले नसावे. मी वेटरला खूप समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मिशेल यांनी आपल्या कार्डाद्वारे बिल चुकते केले, असे ओबामा यांनी यावेळी सांगितले. रेस्टॉरन्टने असे का केले, याची माहिती नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)