ओबामांचा जर्मनीत निवडणूक प्रचार, अँजेला मर्केलसाठी लढवतायत खिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 09:23 PM2017-09-14T21:23:56+5:302017-09-14T21:30:18+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे.
बर्लिन, दि. 14 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत वाशिंगटनमध्ये राहत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे जर्मनीत मर्केल यांनी प्रचारासाठी ओबामांचे पोस्टर्स वापरले आहेत. येत्या २४ सप्टेंबरला जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यात सध्याच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल या चौथ्यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात यंदा प्रथमच एक नवल जर्मन नागरिकांना पाहायला मिळाले आहे. मर्केल यांच्या निवडणूक प्रचार पोस्टर्समध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांची मर्केल यांना समर्थन द्या असे सांगणारी पोस्टर झळकली आहेत. बर्लिन मधील रस्ते, चौक, पार्क व स्टेशन्स अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी लागलेली ही पोस्टर कुतुहलाचा विषय बनली आहेत.
अमेरिकेतील निवडणुकातही डेमोक्रॅटीकच्या उमेदवार हिलरी किलंटन यांच्या प्रचारासाठीही त्यांना समर्थन द्या असे सांगणारी ओबामा यांची पोस्टर लावली गेली होती. मर्कल यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये काळा, लाल व गोल्ड कलरचा वापर केला गेला आहे. तसेच या पोस्टर्सवर मर्केल यांच्या क्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचा लोगोही आहे. या पोस्टरमागे असा संदर्भ आहे की जेव्हा ओबामा जर्मनी भेटीवर आले होते तेव्हा एका भाषणात यांनी मी जर जर्मन मतदार असतो तर मर्केल यांनाच मत दिले असते असा उल्लेख केला होता. ओबामा यांच्या अपीलाचा फायदा मर्केल यांना मिळावा यासाठी ही पोस्टर्स लावली गेली आहेत.
अर्थात निवडणूक तज्ञांच्या मतानुसार मर्केल यांना निवडणूक जिंकण्यासाठी ओबामा यांच्या असल्या मदतीची अजिबात आवश्यकता नाही. त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे ओबामा पोस्टर्स संबंधी त्यांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेने मर्केल यांचा सल्ला घेतलेला नव्हता तसेच ओबामा फौंडेशनलाही या संदर्भात कांहीही माहिती दिली गेलेली नाही असे समजते. तरीही ओबामा यांच्या पोस्टर्सना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
फ्रान्स जनतेला राष्ट्राध्यक्ष म्हणून हवे होते बराक ओबामा
वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये राष्ट्रध्यक्ष पदासाठी निवडणूका झाल्या होत्या. यावेळी फ्रान्स जनतेला राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा हवे होते. ओबामा२०१७ संकेतस्थळाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी याचिका तयार केली. तसेच जनतेला या याचिकेला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करण्याचे जाहीर आवाहन केले. या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळलाहोता. 27000 लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या.