झाडलेल्या ६० पैकी ३४ गोळ्यांनी केली निज्जरच्या देहाची चाळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:22 AM2023-09-27T06:22:05+5:302023-09-27T06:22:36+5:30
हत्येच्या घटनेच्या व्हिडीओच्या आधारे अमेरिकी वृत्तपत्राचा दावा
ओटावा : कॅनडाच्या भूमीतून भारतात दहशतवादी कारवाया करणारा खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची १८ जून रोजी हत्या झाली. ब्रिटिश कोलंबिया येथील गुरुनानक शीख गुरुद्वाराच्या बाहेर हल्लेखोरांनी झाडलेल्या ६०पैकी ३४ गोळ्या त्याला लागल्या होत्या. दोन वाहनांतून सहा हल्लेखोर आले होते. त्या घटनेच्या व्हिडीओच्या आधारे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली.
या सहा हल्लेखोरांपैकी दोघांनी हरदीपसिंग निज्जरवर गोळ्या झाडल्या. त्याच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटांचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. त्याचा भारताने ठाम शब्दांत इन्कार केला. (वृत्तसंस्था)
श्रीलंका, बांगलादेशाने दिला भारताला पाठिंबा
निज्जरच्या हत्येवरून कॅनडाने कोणत्याही पुराव्याविना भारतावर खोटे आरोप केले असल्याची टीका श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी केली आहे. ते म्हणाले की, कॅनडा दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. श्रीलंकेमध्ये नरसंहार झाल्याचा खोटा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता, असेही साबरी यांनी सांगितले. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी सांगितले की, भारत कधीही कोणतेही लांच्छनास्पद कृत्य करणार नाही.
राष्ट्रध्वजाचा अवमान
कॅनडातील खलिस्तान समर्थकांनी मंगळवारी व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने केली. त्यावेळी त्यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना घडली आहे.
पाकच्याही कारवाया
कॅनडाने भारताविरोधात आरोप केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला. त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय करत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी आयएसआयने चालविलेल्या मोहिमेला के (म्हणजे खलिस्तान) असे नाव देण्यात आले आहे.