विज्ञानाची कमाल! पतीच्या निधनाच्या दोन वर्षानंतर दिला त्याच्याच बाळाला जन्म
By sagar.sirsat | Published: July 27, 2017 05:34 PM2017-07-27T17:34:30+5:302017-07-27T17:55:52+5:30
एका महिलेने पतीच्या निधनाच्या दोन वर्षानंतर त्याच्याच बाळाला जन्म दिल्याचं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल...पण हे खरं आहे.
न्यू यॉर्क, दि. 27 - एका महिलेने पतीच्या निधनाच्या दोन वर्षानंतर त्याच्याच बाळाला जन्म दिल्याचं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल...पण हे खरं आहे. एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमध्ये ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. या महिलेचा पती न्यूयॉर्क शहर पोलीस दलात कार्यरत होता.
20 डिसेंबर 2014 रोजी ब्रुकलीन शहरात रात्रीची गस्त घालत असताना काही गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्या गोळीबारात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. व्हेनजियान लिऊ असं त्या पोलीस अधिका-याचं नाव. व्हेनजियान लिऊ याचा मृत्यू झालाय त्यावेळी पी क्षीआ चेन हिच्याशी त्याचं नुकतंच लग्न झालं होतं.
ती रात्र पी क्षीआ चेन हिच्यासाठी त्या काळरात्र होती. पतीला गमावल्याचं दु;ख मनात होतंच पण त्यासोबतच मातृत्वाची आसही अनावर होती. दुसऱ्या पुरुषाचा विचार मनात आणण्याचा काही प्रश्नच नव्हता.
मोठी हिम्मत करून तिने न्यूयॉर्क पोलिसांमधील पतीच्या सहकाऱ्यांकडे आपली एक वेगळी इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीचं वीर्य जतन करून ठेवावं अशी तिची इच्छा होती. किमान अपत्यामध्येतरी पतीचं अस्तित्व अनुभवता येईल हा विचारही त्यामागे होताच. तिची इच्छा मान्य करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तिचा पती व्हेनजियान लिऊ याचं वीर्य जतन करून ठेवण्यात आलं.
पतीच्या निधनाच्या धक्क्यातून आपण आता सावरलो असल्याचं वाटल्यानंतरच पी क्षीआ चेन हिने जतन केलेल्या वीर्याद्वारे कृत्रिम गर्भधारणा करून घेतली, आणि अखेर ती यशस्वी ठरली. नुकताच तिने एका चिमुकलीला जन्म दिला.
मुलीला जन्म दिल्यानंतर पी क्षीआ चेन हिचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला मी तिच्या वडिलांच्या साहसाच्या कथा सांगेल असं पी क्षीआ चेन अभिमानाने सांगते.
पोस्टमार्टम स्पर्म रिट्रायव्हल (पीएमएसआर) म्हणजे मृत्यूनंतर स्पर्म काढून जतन करण्याची प्रक्रिया-
माणसाच्या मृत्यूनंतर जवळपास दिवसभर स्पर्मचे अस्तित्व टिकून असते. स्पर्म बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला फक्त पाच मिनिटांचा वेळ लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. पत्नीच्या विनंतीवरुन डॉक्टर मृत नव-याच्या शरीरातून स्पर्म्स काढून त्याचे जतन करतात. वर्षभरात हे स्पर्म्स पत्नी शरीरात सोडले जातात. ज्यामुळे ती आपल्या नव-यापासून गर्भवती राहते.