अरे बापरे... ७५० टक्के इन्फ्लेशन, आर्थिक खाईत सापडलाय व्हेनेझ्युएला
By admin | Published: February 9, 2016 03:57 PM2016-02-09T15:57:30+5:302016-02-09T15:57:30+5:30
दुष्काळानं झोडपलेल्या आणि प्रचंड महागाईनं त्रासलेल्या व्हेनेझ्युएलातल्या लौकांची प्रचंड दैना उडाल्याचं वृत्त आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
प्युर्तो काबेलो (व्हेनेझ्युएला), दि. ९ - दुष्काळानं झोडपलेल्या आणि प्रचंड महागाईनं त्रासलेल्या व्हेनेझ्युएलातल्या लौकांची प्रचंड दैना उडाल्याचं वृत्त आहे. सगळ्यात मोठं बंदर असलेल्या या शहरामध्ये साधं पिण्याचं पाणी इतकं महाग आहे की, अनेक नागरीक डोंगरांमध्ये झिरपणा-या थेंब थेंब पाण्यासाठी तासन तास बाटल्या धरून उभे राहतात.
न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ऊसाची शेतं उजाड आहेत, दुधाच्या डेअरी बंद पडल्या आहेत, आणि लोकांना पिशव्या भरभरून पैसे दिले तरी सामान मिळत नाहीये, ज्यामुळे काळ्या बाजाराला उधाण आलंय.
या शहरामध्ये आता काहीही राहिलं नसून ही दैना अजून बिकट होण्याची चिन्हे आहेत.
या वर्षी महागाईचा दर ७५० टक्के राहील असा अंदाज आहे, जगामधला सगळ्यात जास्त महागाईच्या वाढीचा हा दर असेल. पेट्रोल डिझेलचे बाव गेल्या दशकभरातल्या नीचांकावर आहेत हाच एक अपवाद.
इथल्या आरोग्यव्यवस्थेचीही वाताहत झालेली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा नाहीये आणि खाट मिळण्यासाठीही खूप मोठी वेटिंग लिस्ट आहे.
व्हेनेझ्युएलामध्ये खनिज तेलाचे सर्वाधिक साठे आहेत, परंतु या देशात आता आर्थिक आणिबाणी लागू करण्यात आली आहे.
एक कप कॉफी आणि प्यायला थोडं पाणी हवं असेल तर नोटांचं अख्ख पुडकं द्यावं लागतं अशी स्थिती आहे.
निकोलस कासे हा न्यू यॉर्क टाइम्सचा पत्रकार, छायाचित्रकार मेरिडिथ कोहटसह गेला महिनाभर व्हेनेझ्युएलाची भ्रमंती करत आहे. तो सांगतो, शेकडो मैल उजाड पडलेली शेती आहे आणि हजारो माणसं अन्नाच्या शोधात आहेत. दुकानात मालाचा ट्रक आलाय अशी अफवा जरी उठली तरी शेकडो लोकं पहाटे साडेपाच वाजता गोळा होतात.
मोठ्या दुकानांमध्ये काही माल असेलच तर दहाच्या सुमारास पोलीस येतात, आणि एकावेळी १२ जणांना आत सोडतात. आदल्या दिवशी एखादी भाजी असते, दूध असतं आणि आटा असतो तर दुस-या दिवशी संपूर्ण दुकानात फक्त खाद्यतेल शिल्लक असतं बाकी सगळं संपलेलं असतं.
बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार अल निनोमुळे पडलेल्या दुष्काळानं वाताहत केली आहे. देशातल्या जलविद्युत प्रकल्प असलेल्या १८ धरणांमध्ये अत्यंत कमी पाणी उपलब्ध आहे. दिवसातून चार ते पाच तास अशी वीजकपात करण्याचा प्रस्ताव आहे.
व्हेनेझ्युएला दुसरीकडे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. या देशाच्या डोक्यावर १८५ अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे आणि कर्जाचे हप्ते चुकण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दोन वर्षांपूर्वी व्हेनेझ्युएलाचे लोकप्रिय अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर आलेली राजकीय अस्थिरता, सलग पडलेला दुष्काळ आणि खनिज तेलाच्या भावांनी गाठलेला नीचांक यामुळे व्हेनेझ्युएलाचे कंबरडे मोडले असून अनिश्चित असा भविष्यकाळ या देशापुढे वाढून ठेवलेला आहे.