'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:21 PM2024-05-29T16:21:24+5:302024-05-29T16:22:40+5:30
ट्रायटन ४०००/२ एक्सप्लोरर नावाचे जहाज डिझाइन केले आहे. या जहाजाची किंमत जवळपास १६६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी अनेकांची इच्छा आहे. यासाठी जवळपास ३८०० मीटर खोलीपर्यंत समुद्रात जाण्यासाठी तयारी दाखवितात. दरम्यान, गेल्या वर्षी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात जाणार आहेत.
अमेरिकन रिअल इस्टेट अब्जाधीश लॅरी कॉनर हे ट्रायटन सबमरीनचे सह-संस्थापक पॅट्रिक लाहे यांच्यासोबत या प्रवासात असणार आहे. यासाठी लॅरी कॉनर यांनी ट्रायटन ४०००/२ एक्सप्लोरर नावाचे जहाज डिझाइन केले आहे. या जहाजाची किंमत जवळपास १६६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे जहाज समुद्रात ४ हजार मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते, म्हणूनच त्याला ४००० असे नाव देण्यात आले आहे.
यासंदर्भात लॅरी कॉनर यांनी अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला मुलाखत दिली. यावेळीसमुद्र किती शक्तिशाली आहे तसेच तो किती सुंदर आहे, हे जगाला दाखवायचे आहे. आपण योग्य पावले उचलल्यास, एक प्रवास जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकते, असे लॅरी कॉनर यांनी सांगितले. दरम्यान, ट्रायटन ही पाणबुडी केव्हा प्रवासाला निघेल, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
याचबरोबर, उत्तर अटलांटिक महासागरातील जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी ३८०० मीटर खोलीवर जायचे आहे, असे पॅट्रिक लाहे यांनी सांगितले. तर लॅरी कॉनर यांच्या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सागरी संघटनेने पूर्णपणे प्रमाणित केल्यानंतरच नियोजित प्रवास सुरु जाईल. त्यानंतरच रवाना होण्याची तारीख निश्चित केली जाईल.
Ohio Billionaire Larry Connor will take $20M sub down to Titanic wreck site to prove industry is safer after OceanGate incident.
— The Wave (@_thewavetv) May 27, 2024
He will be joined by CEO of Triton Submarines Patrick Laney. pic.twitter.com/VN6JerIszW
गेल्या वर्षी टायटन पाणबुडीचा स्फोट
गेल्या वर्षी जून २०२३ मध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट झाला होता. या पाणबुडी असलेले ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ब्रिटिश पाकिस्तानी अब्जाधीश शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, उद्योगपती हमिश हार्डिंग आणि फ्रेंच डायव्हर यांचा समावेश होता.