ओमानच्या आखातात टँकरवरील संशयित हल्ल्यानंतर जागतिक बाजारात तेल महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:53 AM2019-06-15T05:53:57+5:302019-06-15T05:54:43+5:30
कच्च्या तेलाच्या दरात ४.५ टक्के वाढ; पश्चिम आशियाई प्रदेशात तणाव
न्यूयॉर्क : ओमानच्या आखातात दोन तेलवाहू जहाजांवर (टँकर्स) संशयास्पद हल्ला झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत वाढ झाली आहे. तेलाने समृद्ध असलेल्या पश्चिम आशियाई प्रदेशात तणाव वाढल्याची भीती निर्माण झाल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या दरात तब्बल ४.५ टक्के वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक शेअर बाजारात तेल कंपन्यांचे समभाग उसळले आहेत. अमेरिकेकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचा लाभही बाजारांना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
ओमानचे आखात होरमुजच्या सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला आहे. या जलमार्गातून किमान १५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. याशिवाय अब्जावधी रुपयांची तेलेतर मालाची वाहतूकही येथून होते. त्यामुळे येथील अशांततेचा जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होईल. ओमानच्या आखातातील तेलवाहू जहाजावरील हल्ल्यास इराण जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेव यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा आपण उपस्थित करू, असे पॉम्पेव यांनी सांगितले. या भागातील आपल्या फौजा आणि मित्रांचे वॉशिंगटन संरक्षण करील, असा गर्भित इशाराही पॉम्पेव यांनी दिला आहे. इराणने मात्र अमेरिकेचा आरोप फेटाळला आहे. इराणचे विदेशमंत्री मोहंमद जवाद जाफरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अमेरिकेचे आरोप निराधार आहेत. तथ्ये आणि पुरावे हे न पाहताच अमेरिकेने इराणवर आरोप लावले आहेत.
इराणने हटविले न फुटलेले सुरुंग?
च्हल्ला झालेल्या जहाजावरील न फुटलेले सुरुंग इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या जवानांनी हटविले असल्याचा आरोप अमेरिकी लष्कराने केला आहे. एका जहाजावरील सुरुंग रिव्होल्युशनरी गार्ड हटवीत असल्याचा कथित व्हिडिओही अमेरिकी लष्कराने जारी केला आहे.
च्हल्ला झाला ते ठिकाण इराणी समुद्र किनाºयाजवळ आहे. हल्ल्याला बळी पडलेले एमटी फ्रन्ट आॅल्टेअर हे जहाज नॉर्वेचे असून, कोकुका करेजिअस नावाचे दुसरे जहाज जपानच्या मालकीचे आहे. स्फोटानंतर जहाजांवर आग लागली. फ्रन्ट आॅल्टेअर हे जहाज कित्येक तास जळत होते. धुराचे लोट आकाशाला भिडले असल्याचे दिसून आले.