भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजास श्रीलंका समुद्रात भीषण आग; २४ खलाशांपैकी एक जण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:46 AM2020-09-06T01:46:32+5:302020-09-06T07:15:06+5:30
टँकरला किनाºयापासून सुरक्षित अंतरावर हलविण्यात यश
चेन्नई : कुवैतहून भारतासाठी कच्चे तेल घेऊन निघालेल्या एका तेलवाहू जहाजास श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ भीषण आग लागली. या जहाजास किनारपट्टीपासून दूर समुद्रात नेण्यात यश आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आग नियंत्रणात आली होती. तथापि, पूर्णत: विझलेली नव्हती. तेल गळतीचेही कोणतेच वृत्त नव्हते.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भारतीय तटरक्षक दल आणि श्रीलंका नौदलाच्या नौका आणि विमाने यांनी चार टग बोटींच्या साह्याने एमटी न्यू डायमंड नावाच्या या तेलवाहू जहाजास श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून ३५ सागरी मैल आत समुद्रात हटविले.
कुवैतहून निघालेले हे जहाज इंडियन आॅईल कॉर्पोरेशनसाठी २,७०,००० टन कच्चे तेल घेऊन भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील पारादीप बंदरात पोहोचणार होते. गुरुवारी श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीवरील अंपारा जिल्ह्यातील संगमनकांडा जवळ असताना त्याला आग लागली. जहाजावरील २४ खलाशांपैकी एक जण बेपत्ता असून अन्य एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. हे दोघेही फिलिपिन्सचे नागरिक असल्याची माहिती आहे.