ओलिसाचा सेल्फी
By admin | Published: March 31, 2016 03:30 AM2016-03-31T03:30:17+5:302016-03-31T03:30:17+5:30
इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत ब्रिटिश नागरिकाने घेतलेला सेल्फी व्हायरल झाला आहे. या सेल्फीत साक्षात काळासोबत स्मित करणारा ब्रिटिश नागरिक दिसतो.
लंडन : इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत ब्रिटिश नागरिकाने घेतलेला सेल्फी व्हायरल झाला आहे. या सेल्फीत साक्षात काळासोबत स्मित करणारा ब्रिटिश नागरिक दिसतो.
इजिप्तचा नागरिक सैफ अल दीन मुस्तफा याने मंगळवारी इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण केले होते. या विमानातील प्रवाशांमध्ये ब्रिटिश नागरिक बेंजामिन इनेस यांचाही समावेश होता. मुस्तफाने आत्मघातकी पट्टा घातल्याचा दावा करून विमान वेठीस धरले असताना इनेस यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतला. मुस्तफाचा आत्मघातकी पट्टा नंतर नकली निघाला. इनेस हसत मुस्तफाशेजारी उभे असल्याचे या सेल्फीत दिसते. सायप्रसमध्ये धावपट्टीवर सैनिकांनी विमानाला वेढा घातलेला असताना इनेस यांनी हा सेल्फी घेतला. लीडस् येथील रहिवासी असलेले इनेस याबाबत म्हणाले की, मी असे का केले हे मला ठाऊक नाही. मी त्या कठीण प्रसंगात आनंदी राहू पाहत होतो. मुस्तफासोबत सेल्फी घेऊ इच्छितो, असे मी विमान कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याला कळविले. त्यावर तो म्हणाला ठीक आहे. त्यानंतर मी त्याच्याजवळ उभा राहिलो आणि हसत फोटो घेतला, असे इनेस यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)