Video: हौसेसाठी कायपण! 259 वर्षे जुने, तब्बल 360 टनांचे घर पाण्यातून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:19 AM2019-09-30T11:19:45+5:302019-09-30T11:25:24+5:30
1760 मध्ये बांधलेली ही जुनी हवेली एका मोठ्या बोटीवर चढवून ईस्टनवरून क्वीन्सटाउनच्या डेकोर्सी कोवला नेण्यात आली आहे.
मेरीलँड : आज नोकरी धंद्या निमित्ताने मानसे स्थलांतर करत आहेत. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना घरातील कपड्या लत्त्यापासून कपाटेही आपल्यासोबत घेऊन जातात. पण कोणी बांधलेले भक्कम घर घेऊन जात नाही. मात्र अमेरिकेच्या मेरिलँडमध्ये हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे हे घर आताच्या काळात बांधलेले नाही, तर तब्बल 259 वर्षे जुन्ही हवेली आहे आणि ही तीन मजली हवेली तब्बल 80 किमी लांब खाडीतून नेण्यात आली.
नीली नावाच्या कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. 1760 मध्ये बांधलेली ही जुनी हवेली एका मोठ्या बोटीवर चढवून ईस्टनवरून क्वीन्सटाउनच्या डेकोर्सी कोवला नेण्यात आली आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर हे गॅलोवे हाऊस नीली कुटुंबाची संपत्ती बनणार आहे. खरेतर नीली त्यांच्या कुटुंबाच्या पुढील पीढ्यांसाठी एक डेस्टिनेशन होम बनविण्याचा विचार करत होते. यामुळे त्यांनी त्या जागी नवीन घर बांधण्यापेक्षा त्यांचे जुनेच घर नेण्याचा विचार केला. या तीन मजली घराचे वजनही थोडे थोडके नव्हते. तब्बल 3.63 लाख किलो एवढे प्रचंड वजन असलेले काळ्या दगडातील बांधकामाचे घर रस्ते आणि समुद्रमार्गे नेण्यात आले.
रस्ते मार्गे 10 किमी आणि नंतर खाडीच्या पाण्यावरून 80 किमीचा पल्ला गाठण्यात आला. एवढ्या उठाठेवी करण्यासाठी त्यांना 1 दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला. क्रिश्चियन नीली आणि त्यांच्या आई वडिलांनी हा खर्च निम्मा निम्मा उचचला आहे. ते पाण्यावरील जॉर्जियन स्थापत्यकलेचे घर शोधत होते. ते त्यांना मिळाले नाही म्हणून त्यांनी जुने घरच उचलून नेले. तेथे नेल्यावर घराची डागडुजी करण्यात येणार आहे. घराचे बदललेले भाग भंगारात किंवा राडारोडा म्हणून टाकण्यात येणार नसून गरजू लोकांना देण्या येणार आहेत.
ON THE MOVE: Aerial footage shows a barge hauling a 1760s historic home on a 50-mile Chesapeake Bay voyage from Easton, Maryland, to its new plot in Queenstown, where the new owner is planning a restoration project. https://t.co/MQLmgqDKm9pic.twitter.com/rIGbMPAlpt
— ABC News (@ABC) September 29, 2019
हे घर नेण्यासाठी एवढे उपद्व्याप करण्यामागेपण एक कारण आहे. नील यांनी त्यांचे घर 18 व्या शतकातील घरांसारखे ठेवायचे होते. यामुळे बनविलेल्या घराला हलविणे नव्या घरापेक्षा स्वस्त पडते. आता हे घर पुढील काही शे वर्षे भक्कम राहण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे.
इच्छाशक्तीने अशक्यही शक्य केले...
नीली यांना त्यांच्या आई वडिलांसोबत एकत्र रहायचे होते. यासाठी त्यांनी हे घर एवढे लांब नेण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न केले. यासाठी त्यांना सरकारी खात्यांसोबत झगडावे लागले, या खात्यांनी मंजुऱी दिल्यानंतर मग एवढे मोठे घर रस्ते आणि पाण्यातून कसे न्यायचे असा प्रश्न होता. हा एकूण 90 किमीचा पल्ला गाठण्यासाठी चार दिवस लागले. हे घर नवीन तंत्रज्ञानामुळे जमिनीपासून उचलण्यात आले. मोठ्या ट्रकवरून 10 किमी नेल्यानंतर बोटीवर लादण्यासाठी कवायत करावी लागली. तेथून समुद्रमार्गे 80 किमी लांबवर हे घर नेण्यात आले आहे.