OMG! देशाची लोकसंख्या २९ कोटींनी घटणार; जगभरातील घसरण कोणीही थांबवू शकणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:39 PM2022-06-13T15:39:03+5:302022-06-13T15:40:10+5:30
भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे.
वाढती लोकसंख्या जगासाठी आज मोठे संकट बनली आहे. परंतू, वॉशिंग्टन यूनिवर्सिटीने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. परंतू त्यानंतर जी लोकसंख्या घसरेल ती घसरण कोणीही कधीच थांबवू शकणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे.
जगाची लोकसंख्या 2100 पर्यंत कमी होत जाणार आहे. 2064 मध्ये ही लोकसंख्या 9.7 अब्ज एवढी असेल. परंतू, पुढची ३६ वर्षे अशी जातील की ही लोकसंख्या 8.79 अब्जांवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे. यानुसार एकट्या भारतात २९ कोटींनी लोक कमी होणार आहेत.
सर्वाधिक टेन्शन तर चीनला आहे. चीनची लोकसंख्या आता वृद्धापकाळाकडे जाऊ लागली आहे. २१०० मध्ये चीनची लोकसंख्या जवळपास निम्म्याने कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या चीनमध्ये १४० कोटी लोक राहतात. त्यामध्ये 66.8 कोटींची घट होईल आणि लोकसंख्या 74 कोटींवर येईल. लोकसंख्या घसरणीचा जो ट्रेंड सुरु होईल तो कधीही बदलता येणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे.
कुठे कुठे लोकसंख्या वाढणार....
युरोपसह आशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. परंतू आफ्रिकेमध्ये लोकसंख्या वाढणार आहे, मात्र, त्याचा वेग कमी असेल. नायजेरियामध्ये 58 कोटींनी लोकसंख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काय होता जन्मदर...
लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी तज्ज्ञांनी शहरीकरण आणि महिलांच्या शिक्षणाला महत्व दिले आहे. याचबरोबर महिलांचे नोकरी करणे आणि गर्भनिरोधकांचा वापरही याला कारणीभूत आहे. १९६० मध्ये जगात एक महिला सरासरी 5.2 मुलांना जन्म देत होती. आज हा आकडा 2.4 मुले एवढा कमी झालेला आहे. 2100 पर्यंत हा सरासरी आकडा 1.66 मुले एवढाच होणार आहे.