Omicron Corona Virus: दुसऱ्या लाटेसारखेच भारतावर संकट ओढवेल; युएनने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:13 AM2022-01-14T09:13:20+5:302022-01-14T09:14:19+5:30
UN Warning Omicron Corona Virus India: भारतात डेल्टाच्या जिवघेण्या लाटेत एप्रिल ते जूनमध्ये २.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला होता.
संयुक्त राष्ट्रांनी भारताला कोरोना व्हायरसवरून गंभीर इशारा दिला आहे. यूएनच्या रिपोर्टनुसार भारतात कोरोनाची दुसरी लाट म्हणजेच डेल्टा व्हेरिअंटमुळे एप्रिल ते जून या काळात २.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला होता. येत्या काळात तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
युएनच्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिचुएशन अँड प्रॉस्पेक्टस (WESP) 2022 च्या रिपोर्टनुसार ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे नवीन लाट येत आहे. अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणे पक्के आहे. भारतात डेल्टाच्या जिवघेण्या लाटेत एप्रिल ते जूनमध्ये २.४ लाख लोकांचा मृत्यू झाला.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी सर्वांपर्यंत लस पोहोचली नाही तर कोरोना महामारी अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट बनून राहणार आहे. सोबतच दक्षिण आशियाला पुढेदेखील मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते. या ठिकाणी कोरोना लसीकरणाचा वेग खूप कमी आहे. यामुळे नवनवीन व्हेरिअंटचा प्रकोप वाढतच राहणार आहे.
मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकांच्या पोटावर पाय येणार नाही, याची दक्षता घ्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना सांगितले आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असेल, तिथे स्थानिक स्तरावर कन्टेन्मेंट करण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी केली. ओमायक्रॉन विषाणूबद्दल असलेल्या शंकांचे हळूहळू निरसन होत आहे. कोरोना विषाणूच्या आधीच्या प्रकारांपेक्षा नवा विषाणू कित्येक पट वेगाने संसर्ग पसरवत आहे. मात्र, त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा स्थितीत नागरिकांनी अतिशय सतर्क राहिले पाहिजे. त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सांगितले.
संबंधित बातम्या...