Omicron Corona Virus: ओमायक्राॅन हाच कोरोनाच्या साथीला संपविणार; डाॅ. अफशाईन इमरानी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:37 AM2022-01-09T06:37:50+5:302022-01-09T06:38:48+5:30
जगभरातील ८० टक्के लाेकांना याचा संसर्ग हाेउ शकताे. फेब्रुवारीच्या अखेरीस रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण वाढलेले असेल. त्यानंतर मार्चमध्ये लाट ओसरण्यास सुरूवात हाेईल.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जानेवारीच्या अखेरपर्यंत ओमायक्राॅनबाधितांची संख्या उच्चांकी पातळीवर जाईल. तर मार्चमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने घट हाेताना दिसेल. इथूनच काेविड-१९ महामारी संपण्याची सुरूवात असेल, असे भाकित लाॅस एंजेलिस येथील प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. अफशाईन इमरानी यांनी वर्तविले आहे.
डाॅ. इमरानी ट्वीटरच्या माध्यमातून सातत्याने काेराेना महामारीबाबत माहिती देत असतात. त्यांनी महामारी संपण्याबाबत भाकित करणारे एक ट्वीट नुकतेच केले आहे. त्यात त्यांनी सांगितले, की फेब्रुवारीच्या अखेरीस रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण वाढलेले असेल. त्यानंतर मार्चमध्ये लाट ओसरण्यास सुरूवात हाेईल. त्यावेळी रुग्णसंख्येत झपाट्याने घट हाेताना दिसेल. हीच महामारी संपण्याची सुरूवात असेल.
डाॅ. इमरानी यांच्या मते ओमायक्राॅनचा संसर्ग हीच एकप्रकारची लस आहे. जगभरातील ८० टक्के लाेकांना याचा संसर्ग हाेउ शकताे. ओमायक्राॅन हाच महामारीला संपवेल, असे डाॅ. इमरानी यांनी सांगितले.