CoronaVirus News: ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला?; WHOच्या प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:21 PM2022-01-13T13:21:23+5:302022-01-13T13:28:03+5:30
CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; आरोग्य विभागाचं टेन्शन वाढलं
जिनेव्हा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. काल दिवसभरात देशात जवळपास अडीच लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल २७ टक्क्यांची वाढ झाल्यानं चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगानं पसरत असल्यानं सगळेच जण चिंतेत आहेत. अनेक राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी महत्त्वाची माहिती दिली.
कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्यांना ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. 'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे होणारी कोरोनाची लागण गंभीर नाही. पण हा व्हेरिएंट धोकादायक आहे. विशेषत: कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्यांसाठी ओमायक्रॉन अधिक धोकादायक आहे,' अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानॉम यांनी दिली.
कोरोना लस न घेतलेल्यांची संख्या लक्षणीय असल्याचं अधानॉम म्हणाले. 'आफ्रिकेतील ८५ टक्क्यांहून अधिक लोकांना अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही. लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोना महामारी संपणार नाही. त्यामुळे लसीकरण वेगानं पूर्ण करणं गरजेचं आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जगातील ९० टक्के देशांमध्ये ४० टक्के लसीकरणदेखील पूर्ण झालेलं नाही. यापैकी ३६ देशांनी १० टक्के लसीकरणाचा टप्पादेखील ओलांडलेला नाही, अशी आकडेवारी त्यांनी दिली.