Omicron: कोरोना महामारीबाबत WHO ची चिंता वाढवणारी भविष्यवाणी; जग सध्या नाजूक स्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:52 PM2022-01-24T18:52:40+5:302022-01-24T18:53:21+5:30
कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे
नवी दिल्ली – जगातील सर्वच देश सध्या कोविड १९(Covid 19) च्या सर्वात खतरनाक ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटशी लढा देत आहेत. त्यातच जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाचे आणखी नवे व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. याचा अर्थ असा की कोरोनाच्या ओमायक्रॉननंतर नव्या व्हेरिएंटचा प्रार्दुभाव होण्याचा धोका आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस अदनोम गेब्रेयेसस यांनी सांगितले की, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे जगात ८ कोटींहून अधिक रुग्ण आढळून आलेत. जे २०२० च्या महामारीपेक्षा अधिक आहेत. सध्या महामारीची परिस्थिती पाहता ओमायक्रॉन हा अखेरचा व्हेरिएंट नाही. परंतु कोविड १९ महामारीची तीव्रता यावर्षाच्या अखेर पर्यंत समाप्त केली जाऊ शकते असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु त्यासाठी सर्व देशांनी व्यापक रणनीती आणि पर्यायांचा वापर करायला हवं असं WHO नं सांगितले.
कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कमीत कमी देशातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करायला हवं. देशात कोविड १९ टेस्टिंगला चालना देणे, भविष्यातील व्हेरिएंटचा शोध घेणे आणि महामारी संबंधित सर्व समस्यांवर समाधान शोधणं गरजेचे आहे. केवळ संकट संपण्याची वाट पाहू नये अशी सूचना WHO ने केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेचे प्रमुख पत्रकार परिषदेत म्हणतात की, कोविड १९ महामारी आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. आपण सध्या नाजूक स्थितीत आहोत. आपल्याला ही महामारी नष्ट करण्यासाठी एकत्र येत काम करायला हवं. दहशतीच सावट ठेवून या महामारीला वाढण्यासाठी मदत करु शकत नाही.
पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल– IIT रिपोर्ट
कोरोनाची तिसरी लाट पुढील दोन आठवड्यांत टोक गाठेल. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा दर म्हणजेच आर व्हॅल्यू १४ ते २१ जानेवारीदरम्यान १.५७ होता. म्हणजेच दोन व्यक्तींच्या माध्यमातून तीन जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. हा दर येत्या काही दिवसांत आणखी खाली जाईल, असं IIT मद्रासचा रिपोर्ट सांगतो. एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किती जणांना कोरोना बाधित करू शकते, त्या दराला आर व्हॅल्यू म्हटलं जातं. हा दर १ च्या खाली गेल्यास महामारीची स्थिती संपल्याचं समजतात.
आयआयटी मद्रासच्या अहवालानुसार, १४ ते २१ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू १.५७ होती. ७ ते १३ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू २.२ आणि त्याआधी १ ते ६ जानेवारी दरम्यान २.९ होती. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांत कोरोना प्रादुर्भावाचा दर कमी होताना दिसत आहे. पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल असा अंदाज आयआयटी मद्रासकडून व्यक्त करण्यात आला आहे.