Omicron Variant : जगभरात वेगाने पसरतोय ओमायक्रॉन, आतापर्यंत 57 देशांमध्ये आढळले रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:52 PM2021-12-08T16:52:07+5:302021-12-08T16:53:51+5:30
Omicron Variant : ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
जिनेव्हा : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतासह जगभरातओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी सांगितले की, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आतापर्यंत 57 देशांमध्ये नोंदविले आहेत. तसेच, झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत लोकांचा मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ओमायक्रॉनचे म्यूटेशन लसींद्वारे उत्पादित प्रतिकारशक्तीवर परिणाम करू शकते का? डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा अधिक संसर्गजन्य आहे का? संसर्ग वाढल्यास लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता किती आहे? प्रकरणांची वाढ आणि मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ किती अंतर आहे? असे सवाल करण्यात येत आहेत. यावर जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे की, या सर्व प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे होणाऱ्या संसर्गाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक डेटा आवश्यक आहे.
दुसरीकडे, झिम्बाब्वे सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. ज्यांना कोरनाची लस मिळालेली नाही, त्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यापासून रोखण्यासाठी सरकारने कठोर योजना आखली आहे. सरकारने म्हटले की, देशात कोरोना लसीकरणाचा दर वाढविला जाईल. एवढेच नाही तर व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी कडक नियम लागू केले जातील. झिम्बाब्वेने वर्षाच्या अखेरपर्यंत 60 टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतातही चिंता!
भारतासह जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. भारतातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा 20 च्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.