Omicron Variant: अमेरिकेतील धक्कादायक चित्र; बूस्टर डोस घेऊनही १४ जणांना ओमायक्रॉनची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 10:32 AM2021-12-11T10:32:11+5:302021-12-11T10:33:24+5:30
आकडेवारी पाहिली तर घाबरण्याचं कारण नाही. परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या कोविड लसी नव्या आणि जास्त संक्रमित करणाऱ्या ओमायक्रॉनविरुद्ध कमी सुरक्षा देत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
वॉश्गिंटन – अमेरिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटनं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. याठिकाणी लसीचे दोन्ही डोस त्याचसोबत बूस्टर डोस घेतलेले लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या विळख्यात सापडले आहेत. शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ४३ पेक्षा जास्त संक्रमित आढळले आहे. या रुग्णांचं पूर्ण लसीकरण झालेलं असतानाही त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे.
तर बूस्टर डोस घेतलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण होत आहे. अमेरिकेचं सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँन्ड प्रिवेंशन(CDC) ने म्हटलं आहे की, आतापर्यंत अमेरिकेत ४३ रुग्ण ओमायक्रॉनचे आढळले आहेत. यातील ३४ जणांचं पूर्ण लसीकरण झालेले आहे. तर १४ जणांनी बूस्टर डोसही घेतला होता. यातील ५ जण असे आहेत ज्यांनी १४ दिवसांच्या आधी लसीचा बूस्टर डोस घेतला होता. आकडेवारी पाहिली तर घाबरण्याचं कारण नाही. परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या कोविड लसी नव्या आणि जास्त संक्रमित करणाऱ्या ओमायक्रॉनविरुद्ध कमी सुरक्षा देत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ओमायक्रॉनच्या ४३ रुग्णांपैकी २५ जणांचं वय १८ ते ३९ च्या दरम्यान आहे. अमेरिकेत आतापर्यंत ओमायक्रॉनने संक्रमित २५ रुग्ण १८ ते ३९ या वयोगटातील आहेत. १४ जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. ६ जण आधीच कोरोनानं संक्रमित झाले होते. दिलासादायक म्हणजे अनेकांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. रुग्णांना खोकला, थकवा अशी लक्षण आढळत आहेत. रिपोर्टनुसार १ व्यक्ती २ दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनच्या पहिल्या रिपोर्टमध्ये अनेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसत असल्याचं म्हटलं. संक्रमण आणि अधिक गंभीर यात अंतर आहे. लस घेतलेले आणि यापूर्वी ज्यांना कोरोना झाला आहे यांना ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर सौम्य लक्षण आढळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेत १ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. हा दक्षिण आफ्रिकेतून आला होता तसेच त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. अमेरिकेत आजही एकूण रुग्णांपैकी ९९ टक्के डेल्टा संक्रमित रुग्ण आढळत आहेत. परंतु दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत अधिक संक्रमित करत असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.