CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका कोणाला?; समोर आली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 12:02 PM2021-11-28T12:02:29+5:302021-11-28T12:03:59+5:30
आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान; संपूर्ण जगाची चिंता वाढली
जोहान्सबर्ग: कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत ३० पट अधिक वेगानं पसरतो. व्हेरिएंटच्या म्युटेशनचा वेग काळजी वाढवणारा आहे. आफ्रिका खंडातील देशांमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांनी आफ्रिकेहून सुरू असलेली वाहतूक रोखली आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट कोणत्याही प्रमुख सिंड्रोमशिवाय हलक्या आजाराचं कारण ठरत असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी दिली. नव्या व्हेरिएंटमुळे हलक्या स्वरुपाचा त्रास होतो. मांसपेशींमध्ये वेदना, एक दिवस थकवा किंवा दोन दिवस ताप अशी लक्षणं दिसून येतात. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांना वास येणं बंद व्हायचं. मात्र नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांना तसा त्रास होत नाही. त्यांना हल्का कफ जाणवतो, अशी माहिती दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा एँजेलिक कोएट्रजी यांनी दिली.
नव्या रुग्णांची संख्या किती? धोका कोणाला?
नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांची संख्या फारशी नाही. बरेचसे ओमिक्रॉनग्रस्त घरातच उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवर फारसा ताण नाही. या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगानं वाढण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबद्दलची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश रुग्ण तरुण आहेत. त्यांचं वय ४० पेक्षा कमी आहे, असं कोएट्रजी यांनी सांगितलं.