Omicron Variant : बापरे! 'त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो ओमायक्रॉन'; धडकी भरवणारा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 09:31 AM2022-01-27T09:31:25+5:302022-01-27T09:39:48+5:30
Omicron Variant : ओमायक्रॉनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. अशातच ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. याच दरम्यान आता एका रिसर्चमधून ओमायक्रॉनबाबत धडकी भरवणारा एक दावा करण्यात आला आहे. ओमायक्रॉन त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो असं म्हटलं आहे. एका नव्या रिसर्चनुसार, SARS-CoV-2 व्हायरसचा ओमायक्रॉन प्रकार त्वचेवर 21 तास, तर प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आठ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. हा प्रकार अधिक संक्रमक असण्यामागे हेच मुख्य कारण असल्याचंही मानलं जातं आहे.
जपानमधील क्योटो प्रिफेक्चरल यूनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या (Kyoto Prefectural University of Medicine in Japan) संशोधकांनी हा रिसर्च केला आहे. त्यांनी वुहानमध्ये सापडलेल्या SARS-Cov-2 व्हायरसच्या विविध पृष्ठभागावर जगण्याच्या क्षमतेची इतर गंभीर स्वरूपांशी तुलना केली आहे. संशोधकांना असे आढळून आले की अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकार त्वचेवर आणि प्लास्टिकच्या आवरणावर व्हायरसच्या वुहान व्हेरिएंटपेक्षा दुप्पट जास्त काळ राहू शकतात. हेच कारण आहे की चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या मूळ व्हेरिएंटपेक्षा या व्हेरिएंटमधून संसर्ग होण्याचे प्रमाण खूप जास्त नोंदवले गेले आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, वुहान व्हेरिएंट प्लास्टिकच्या पृष्ठभागावर सरासरी 56 तास जगू शकतो, तर अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटसाठी अनुक्रमे 191.3 तास, 156.6 तास, 59.3 तास, 114 तास आणि 193.5 तास जगू शकतो. संशोधकांच्या मते, वुहान व्हेरिएंट त्वचेवर 8.6 तास टिकू शकतो. त्याच वेळी, अल्फा व्हेरिएंट 19.6 तास, बीटा व्हेरिएंट 19.1 तास, गामा व्हेरिएंट 11 तास, डेल्टा व्हेरिएंट 16.8 तास आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट 21.1 तास टिकू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रय़त्न केले जात आहेत.
मोठा दिलासा! ओमायक्रॉनची लागण झाली तरी आता नो टेन्शन, कारण...
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी रोग प्रतिकारशक्ती विकसित होते, जी फक्त ओमायक्रॉनच नाही तर डेल्टासह इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते. आयसीएमआरने (ICMR) केलेल्या रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन-निर्मित प्रतिकारशक्ती व्हायरसच्या डेल्टा थोपवू शकते. यामुळे डेल्टा पासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. डेल्टाचा संसर्ग संपुष्टात येईल, असेही मत रिसर्चमध्ये मांडण्यात आले आहे. या संशोधनात ओमायक्रॉनवर लस बनविण्यावर भर देण्यात आला आहे. AstraZeneca, Moderna, Pfizer यासह इतर अनेक कंपन्या नवी लस बनवण्याच्या तयारीत आहेत. मार्चच्या अखेरीस ही लस ओमायक्रॉनला टक्कर देण्यासाठी बाजारात येईल असा दावा केला जात आहे. PTI च्या वृत्तानुसार, ICMR ने एकूण 39 लोकांचा अभ्यास केला, त्यापैकी 25 जणांनी AstraZeneca च्या अँटी-कोरोना व्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतले.