Omicron Variant : ओमायक्रॉनच्या धोक्यादरम्यान संशोधनातून सकारात्मक माहिती समोर; भारतातील 'ही' लस करणार बूस्टर डोसचं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 12:59 PM2021-12-03T12:59:05+5:302021-12-03T13:00:02+5:30
Omicron Variant : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून संपूर्ण जगासाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे.
Omicron Variant : कोरोनातून संपूर्ण जग सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे धोका निर्माण होत असल्याचं समोर आलं. परंतु ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या एका संशोधनातून जगभरासाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. जगभरात वापर होत असलेल्या सात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा बुस्टर डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. या सात लसींमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात दिल्या जात असलेल्या कोविशिल्ड (Covishield) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचाही समावेश आहे.
ज्या लोकांनी कोविशिल्ड किंवा फायझरच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला आहे त्यांच्यावर संशोधन करण्यात आलं आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना तिसरा डोस देण्यात आला. यापूर्वीही कोविशिल्डबाबत एक अभ्यास करण्यात आला होता. कोविशिल्ड आणि फायझरचा डोस दिल्याच्या सहा महिन्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यापासून ७९ टक्के तर मृत्यूपासून ९० टक्के सुरक्षा मिळाल्याचं दिसून आलं होतं.
७ लसींमुळे धोका नाही
काही संशोधनांमध्ये कालांतरानं लस दिलेल्यांमध्येही कोविड संसर्गाविरोधात सुरक्षा कमी होत असल्याचे संकेत मिळाले होते. यामुळेच ज्यांना अधिक धोका आहे अशा व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात यावा असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं. परंतु तिसरा डोस घेतल्यानंतर त्यापासून किती सुरक्षा वाढेल याबाबत अधिक संशोधन झालेलं नाही. ऑक्सफर्ड, फायझर, नोवावॅक्स, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, वलनेवा आणि क्योरवॅक या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा समावेश असल्याचं लॅन्सेटमध्ये गुरूवारी छापण्यात आलेल्या संशोधनात सांगण्यात आलं आहे.
या संशोधनात २८७८ व्यक्तींचा समावेश करण्यात आला, तसंच संबंधित सात लसी घेतले्यांना धोका नसल्याचंही समोर आलं. लस घेतल्यानंतर थकवा, डोकेदुखी, लस घेतलेल्या ठिकाणी दुखणं अशी सामान्य लक्षणं दिसून आली. अनेक तरुणांमध्ये ही लक्षणं दिसून आली. परंतु २४ जणांना गंभीर साईडइफेट्सचा सामना करावा लागला. अल्फा, बीटा, डेल्टा आणि चीनमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोना विषाणूवरही लसीचा परिणाम पाहण्यात आला.
स्पाईक प्रोटिनचं प्रमाण वाढलं
दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये १० ते १२ आठवड्यांनंतरही ७ लसींनी बुस्टर डोस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढवल्याचं संशोधनातून समोर आलं. या संशोधनात, बूस्टर डोसनंतर २८ दिवसांनी कोविशील्ड लस देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये स्पाइक प्रोटीनचे प्रमाण १.८ वरून ३२.३ पट वाढले. दरम्यान, बूस्टर डोसचा प्रभाव राहतो की नाही हे वर्षभर पाहिलं जाणार आहे, असंही वैज्ञानिकांनी सांगितलं.