अमेरिका : एक कोटी स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल, पाच लाख भारतीयांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 03:13 AM2021-01-21T03:13:47+5:302021-01-21T03:13:59+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांच्या रोजगार संधींवर गदा येते, असा ट्रम्प यांचा आक्षेप होता. त्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली चार वर्षे राबविली.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जो बायडेन स्थलांतर विधेयकाला लगेचच मंजुरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १ कोटी १० लाख स्थलांतरितांना त्या देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा नागरिकांमध्ये पाच लाख भारतीयवंशीयांचाही समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांच्या रोजगार संधींवर गदा येते, असा ट्रम्प यांचा आक्षेप होता. त्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली चार वर्षे राबविली.
बायडेन यांच्या पहिल्या भाषणाशी भारतीय संबंध -
जो बायडेन यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिले भाषण आणि त्यांच्या भाषणाशी भारताचे असलेला संबंध भारतीयांसाठी विशेष असेच आहे. बायडेन यांचे पहिले वहिले भाषण तयार करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत भारतीय वंशाचे विनय रेड्डी. त्यांनी यापूर्वीही निवडणूक प्रचारादरम्यान बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषणे लिहिली आहेत. विनय रेड्डी हे ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉचे माजी विद्यार्थी आहे.