"एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:51 IST2025-04-02T08:51:18+5:302025-04-02T08:51:42+5:30

बांगलादेशच्या सरकारने भारतात शेख हसीना यांच्या पक्षाचे लोक असल्याचा दावा केला आहे.

One lakh people of Sheikh Hasina party are in India statement by the Bangladesh government | "एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा

"एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा

Bangladesh Government: बांगलादेशात सत्ता पालटल्यापासून भारतासोबत तिथले संबंध तणावाचे बनले आहेत. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे भारताकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. बांगलादेशातल्या हिंसाचारनंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर आता बांग्लादेश सरकारने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शेख हसीना यांच्या पक्षातील एक लाख लोक भारतात पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे.

बांगलादेशचे अंतरिम सरकारने आता भारतासोबतच्या संबंधात विष कालवण्यास प्रयत्न करत आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांवरील विधानानंतर वाद सुरु असताना आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या माहिती सल्लागाराने मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे एक लाख सदस्य भारतात असल्याचा दावा माहिती सल्लागार महफूज आलम यांनी केला.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी मंगळवारी हा धक्कादायक दावा केला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेल्याचे महफुज आलम यांनी म्हटलं. महफुज आलम यांच्या या विधानाने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरु असताना महफुज आलम यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.

ढाका येथे ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात महफुज आलम यांनी हे विधान केले. शेख हसीना यांच्या कार्यकाळात कथितपणे बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते. ढाका शहरातील तेजगाव परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता. "शेख हसीना यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जबरदस्तीने लोकाना बेपत्ता करण्याची आणि खून करण्याची पद्धत अवलंबली. भारताने त्यांना आणि त्यांच्या दहशतवादी शक्तींना आश्रय देण्याचे निवडले हे दुर्दैव आहे. आम्हाला कळले आहे की सुमारे १,००,००० अवामी लीग सदस्यांनी तिथे आश्रय घेतला आहे," असं महफुज आलम म्हणाले.

निवडणुकीच्या वेळी लोक गायब झाले

"२०१३ आणि २०१४ मध्ये लोक मतदानाच्या हक्कासाठी लढत असताना बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. या कृतींमागील मुख्य उद्देश निवडणूक व्यवस्थेची तोडफोड करणे हा होता. आता आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, बेपत्ता होण्याच्या प्रकरणात गुंतलेल्या अनेक लोकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इतर अनेकांविरुद्ध तपास अजूनही सुरू आहे," असेही महफुज आलम यांनी म्हटलं.

अवामी लीगच्या लोकांना परत येऊ देणार नाही

"अवामी लीगचा राजकीय विरोध करणाऱ्यांना जबरदस्तीने गायब करण्यापूर्वी दहशतवादी आणि अतिरेकी म्हटलं गेले. त्यांच्या कुटुंबीयांनाही भीती आणि धमक्यांचा सामना करावा लागला. देशाच्या तपास यंत्रणांचा वापर लोकांना गायब करण्यासाठी केला. हसीना अजूनही भारतात राहून देशाविरुद्ध कट रचत आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. अवामी लीगला बांगलादेशात परत येण्याची संधी कधीही दिली जाणार नाही," असं महफुज आलम म्हणाले. 
 

Web Title: One lakh people of Sheikh Hasina party are in India statement by the Bangladesh government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.