एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:57 IST2025-01-10T15:56:47+5:302025-01-10T15:57:07+5:30
America Fire Update: अग्निकांडाला जबाबदार असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे.

एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला
कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने सुमारे १० हजार इमारती, ३० हजार घरे आणि हजारो एकरांतील जंगल भस्मसात केले आहे. ही आग एवढी भयानक पसरलीय की महासत्ता असलेली अमेरिकाही हतबल झाली आहे. ही आग आता हॉलिवूडच्या विविध स्टुडिओ आणि अभिनेते-अभिनेत्यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. ही आग कशी लागली याचा शोध आता एफबीआयपासून यंत्रणा घेत आहेत. अशातच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
या अग्निकांडाला जबाबदार असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार लॉस एंजेलिसच्या वेस्ट हिल्समधून एका बेघर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीने गुरुवारी कैनेथ येथे आग लावली होती. या आगीने रौद्ररुप धारण केले होते. यामुळे आजुबाजुच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
गुरुवारी दुपारी वेस्ट हिल्समधील व्हिक्टरी ट्रेलहेडजवळ आग लागली होती. या आगीने रौद्ररुप घेत सुमारे ८०० एकरात पसरली होती. आग नियंत्रणात आली आहे, असे लॉस एंजेलिस अग्निशमन प्रमुख क्रिस्टन क्रॉली यांनी सांगितले आहे. पोलिस आणि अग्निशमन विभाग या घटनेचा तपास संभाव्य गुन्हा म्हणून करत आहेत.
गेल्या काही दिवसांत लॉस एंजेलिस काउंटीमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्या आहेत. यापैकी तीन अद्याप आटोक्यात आलेल्या नाहीत. यामागे या व्यक्तीचा हात आहे का हे देखील पाहिले जात आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे आणि लवकरच या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.