CoronaVirus News: वन मिटर हॅट- शारीरिक अंतरासाठीची करामत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:12 AM2020-05-02T02:12:31+5:302020-05-02T02:13:04+5:30
चीनमध्ये मात्र असं काही झालं नाही. एकतर फार कमी मुलं शाळेत आली. पालकांनी भितीपोटी मुलांना शाळेत पाठवलं नाही.
चीनमध्ये शाळा पुन्हा सुरु झाल्या. २६ एप्रिलला शाळा उघडल्या. तीन महिने घरामध्ये डांबलेली, कोरोना कोंडीत उबगलेली मुलं शाळांमध्ये परतली.
एरव्ही शाळा सुरु होतात, जगभरात कुठंही तेव्हा किती आनंद असतो. मुलं धावतात, पळतात, जुने मित्र भेटतात, हातात हात घालतात, कंबरेभोवती, खांद्यावर हात ठेवून मस्त गप्पा मारतात. एकमेकांचे डबे खातात. लोटालोटी, पळापळी, पकडापकडी सगळं होतं. शाळा जिवंत होते. चीनमध्ये मात्र असं काही झालं नाही. एकतर फार कमी मुलं शाळेत आली. पालकांनी भितीपोटी मुलांना शाळेत पाठवलं नाही. मात्र चिनमधल्या झेजिंग प्रांतातल्या हॅँगझू शहरातल्या यांगझेंग प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी भलताच भन्नाट प्रयोग केला. त्यांनी पालकांना सांगितलं की, तुमच्या मुलांसाठी हॅट बनवा. वन मिटर हॅट. म्हणजे डोक्यावर टोपी, तिला कानाशी हात लांब केल्यासारखे दोन बांबू, दोन पट्ट्य... काहीही.. म्हणजे तेवढं अंतर मुलं एकमेकांपासून लांब राहतील.
तशा हॅट घालून मुलं शाळेत आली. त्याचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाले. मुलं एकदम शांत, गुमसूम होती. पुढे जाऊन जगभरातल्या मुलांच्या डोक्यावर अशा टोप्या घालाव्या लागल्या, तर मुलांच्या स्वच्छंदी बालपणाचं काय होणार, असा प्रश्न आहेच.