लॉकडाऊनमध्ये अतिरेक्यांकडून ऑनलाइन भरती -गुटेरेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:50 AM2020-04-29T04:50:29+5:302020-04-29T04:50:42+5:30
युवकांमध्ये असलेल्या संतापाचा व रागाचा लाभ हे दहशतवादी गट समाजमाध्यमांवर जोरदार मोहीम राबवून त्यांची ऑनलाईन भरती करून घेण्यासाठी घेत आहेत.
संयुक्त राष्ट्रे : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा दहशतवादी गट घेत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी दिला. युवकांमध्ये असलेल्या संतापाचा व रागाचा लाभ हे दहशतवादी गट समाजमाध्यमांवर जोरदार मोहीम राबवून त्यांची ऑनलाईन भरती करून घेण्यासाठी घेत आहेत. ‘युवक, शांतता आणि सुरक्षा’ यावर संमत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ठरावाच्या पाच वर्षांचा आढावा गुटेरेस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला तेव्हा त्यांनी वरील इशारा दिला.
दरवर्षी १२ दशलक्ष मुली या स्वत:च मुलीच्या अवस्थेत असताना आई बनतात. ही सगळी निराशाजनक परिस्थिती अगदीच स्पष्ट सांगायचे, तर सत्तेत असलेल्यांकडून युवकांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, राजकीय व्यवस्था आणि संस्थांची घटलेली विश्वासार्हता याला कारणीभूत आहे. ही सगळी परिस्थिती एकत्र येते तेव्हा युवकांमधील संताप व राग आपल्या लाभासाठी करून घेऊन त्यांना मूलतत्त्ववादी बनवणे सोपे जाते.
>द्वेष पसरवत आहेत
गुटेरेस म्हणाले, ‘कोविड-१९ मुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा असे गट घेत असल्याचे आम्ही आधीच बघत आहोत. हे गट समाजमाध्यमांचा वापर द्वेष पसरवण्यासाठी आणि घरी जे युवक आॅनलाईन असतात त्यांना आपल्यात भरती करून घेण्यासाठी करीत आहेत.’
सुरक्षा परिषदेला गुटेरेस यांनी म्हटले की, सध्याचे संकट यायच्या आधीच युवकांसमोर फार मोठ्या प्रमाणावर आव्हाने उभी होती. प्रत्येक पाच युवकांमध्ये एक जण शिक्षणात नाही किंवा बेरोजगार आहे. प्रत्येक चार युवकांपैकी एक जण हिंसाचाराने किंवा संघर्षाने त्रासलेला आहे.