इसिसकडून महिलांची आता आॅनलाइन विक्री
By admin | Published: July 7, 2016 04:08 AM2016-07-07T04:08:59+5:302016-07-07T04:08:59+5:30
इस्लामिक स्टेटचे (इसिस) दहशतवादी गुलाम बनविण्यात आलेल्या महिलांची आता ‘व्हॉटस् अॅप’ व‘टेलिग्राम’ यासारख्या ‘अॅप’च्या माध्यमातून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
खानकी : इस्लामिक स्टेटचे (इसिस) दहशतवादी गुलाम बनविण्यात आलेल्या महिलांची आता ‘व्हॉटस् अॅप’ व‘टेलिग्राम’ यासारख्या ‘अॅप’च्या माध्यमातून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
क्रौर्य व अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडत इसिसने या महिलांचा बाजार मांडला असून, ते अल्पवयीन मुलींचीही आता आॅनलाईन विक्री करीत आहेत. यासाठी ते गुलाम महिला- मुलींची छायाचित्रे, त्यांच्या मालकाचे नाव आणि तिच्या कौमार्याची माहिती देतात. इसिसच्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी १२ वर्षांची मुलगी विक्री करणे असल्याची जाहिरात टेलिग्राम अॅपवर दिली होती. कुमारिका, सुंदर, वय १२ वर्षेआणि आॅनलाईन बाजारातील तिची किंमत साडेबारा हजार डॉलरपर्यंत गेली असून तिची लवकरच विक्री होईल, असा घृणास्पद मजकूर या जाहिरातीत होता. याशिवाय मुलीचे छायाचित्रही टाकण्यात आले होते.
या भागात टेलिग्राम लोकप्रिय असून दहशतवादी टेलिग्रामवर मुलींची राजरोसपणे विक्री करीत आहेत. दहशतवादी व्हॉटस् अॅप आणि टेलिग्रामद्वारे सात महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतच्या मुलीचीही ३७०० डॉलरला विक्री करीत आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांनी ३००० हून अधिक मुलींना लैंगिक दासी बनविले असल्याचे वृत्त विविध दैनिकांनी दिले आहे. या मुलींपैकी बहुतांश मुली अल्पसंख्याक याझिदी समाजाच्या आहेत. इसिसच्या ताब्यातील महिला, मुलींची सुटका करणे अत्यंत कठीण आहे. शिवाय त्यांना तेथून पळ काढणेही शक्य नाही. कारण, त्यांच्या नावाची त्यांच्या मालकाच्या नावे
नोंद असते आणि इसिसच्या
प्रत्येक तपासणी नाक्याकडे याची यादी आहे. (वृत्तसंस्था)
ओलीस महिलांची संख्या किती हे स्पष्ट नाही
इसिसने २०१४ मध्ये इराकवर हल्ला करून याझिदी समाजाला लक्ष्य करीत या समाजातील हजारो मुली आणि महिलांना ओलिस ठेवले होते. युद्धापूर्वी या समाजाची इराकमधील संख्या पाच लाख होती; मात्र आता त्यांची संख्या किती आहे हे सांगता येत नाही.