CoronaVirus बाधितांपैकी ७६ टक्के रुग्ण केवळ आठ देशांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:05 AM2020-04-11T06:05:49+5:302020-04-11T06:06:02+5:30
बाधितांची संख्या १६ लाखांवर : अमेरिका, युरोपात बाधितांची संख्या अधिक
विशाल शिर्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना विषाणूचा (कोविड-२०१९) विळखा संपूर्ण जगभर बसला असून, शुक्रवारी (दि. १०) बाधितांचा आकडा १६ लाखांवर गेला आहे. एकूण बाधितांपैकी तब्बल ७६ टक्के रुग्ण केवळ आठ देशांमध्येच आहे. त्यात प्रामुख्याने अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि इराण या देशांचा समावेश होतो. बुधवारी (दि. ८) असलेल्या साडेतेरा लाख बाधितांपैकी १०,२०,८६३ रुग्ण या सात देशांत असून, ३,३२,४९८ रुग्ण उर्वरित देशांमध्ये आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी (दि. ८ एप्रिल) जाहीर केलेल्या कोरोना अहवालातून ही माहिती समोर आली आहे. बुुधवार अखेरीस जगातील कोरोना बाधितांचा आकडा १३ लाख ५३ हजार ३६१ वर गेला होता. त्यात ७६ हजार ६३९ रुग्णांची भर पडली. तसेच, मृतांचा आकडा ७९ हजार २३५ गेला होता. त्यातही नव्या ६ हजार ६९५ मृत्यूंची भर पडली. गुरुवारी दुपारपर्यंत बाधितांचा आकडा १३ लाख ९५ हजार १३६वर गेला होता. तर, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८१ हजार ५८० वर गेली होती. शुक्रवारी बाधितांचा आकडा १४ लाखांवर गेलेला असेल. स्पेन, इटली आणि जर्मनीतील बाधितांची संख्या एक लाखावर गेली असून, स्पेन आणि इटली लवकरच दीड लाखाचा टप्पा पार करेल, अशी स्थिती आहे. या तीनही देशांमध्ये ३ ते साडेपाच हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेमध्ये बाधितांच्या संख्येमध्ये अत्यंत वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी अमेरिकेतील बाधितांची संख्या ४ लाख ५४ हजारावर गेली होती. बुधवारच्या तुलनेत ३७ हजार ९४ रुग्णांची त्यात भर पडली. तसेच, मृतांचा आकडा देखील १५ हजारांच्या घरात गेला आहे. बाधितांचा आकडा लवकरच पाच लाखांचा टप्पा पार करेल, अशी स्थिती आहे.
चीनमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण शंभराखाली
कोरोनाचा जगभर प्रसार झालेल्या चीनमधे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे दिसून येत आहे. चीनमधे बाधितांची संख्या ८३,१५७ असून, नवीन ८६ रुग्ण आढळून आले आहेत; तसेच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३४२ असून, त्यात नवीन मृतांची संख्या २ आहे. मात्र, चीन जाहीर करीत असलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली जात आहे. चीनने त्यावर भाष्य न करता, वुहान प्रांतातील लॉकडाऊन शिथिल करून त्यावर उत्तर दिले आहे.
जपान, थायलंडने रोखला प्रसार
चीननंतर सुरुवातीला बाधितांचा आकडा असणाऱ्यांमध्ये जपान, थायलंड आणि कोरियाचा समावेश होता. त्यातील जपान आणि थायलंडने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आहे. जपानमधे ८ एप्रिलअखेरीस ४२५७ बाधित असून, ३५१ नवीन रुग्ण सापडले आहेत. मृतांचा आकडा ८१ आहे. थायलंडमधे २,३६९ रुग्ण असून, त्यात १४९ नवीन रुग्ण आहेत. तर, मृतांचा आकडा तीस आहे. भारतात ८ एप्रिलअखेरीस बाधितांची संख्या ५,७०९ झाली असून, मृतांची संख्या २१० आहे.