ढाक्यातील हल्ला ही केवळ झलक !
By admin | Published: July 7, 2016 01:48 AM2016-07-07T01:48:56+5:302016-07-07T01:48:56+5:30
ढाका शहराच्या श्रीमंत वस्तीतील एका उपाहारगृहावर झालेला दहशतवादी हल्ला ही भविष्यात काय घडू शकते याची केवळ झलक आहे, असे म्हणून इस्लामिक स्टेटने (इसिस) सर्वत्र आपले
वॉशिंग्टन/ढाका : ढाका शहराच्या श्रीमंत वस्तीतील एका उपाहारगृहावर झालेला दहशतवादी हल्ला ही भविष्यात काय घडू शकते याची केवळ झलक आहे, असे म्हणून इस्लामिक स्टेटने (इसिस) सर्वत्र आपले
राज्य स्थापना होईपर्यंत केवळ बांगलादेशातच नव्हे, तर इतरत्रही असेच हल्ले वारंवार होत राहतील, अशी धमकी दिली आहे.
गेल्या शुक्रवारी बांगलादेशातीलच श्रीमंत व पुरोगामी विचारांच्या कुटुंबांतील पाच सशस्त्र तरुणांनी केलेल्या हल्ल्यात बहुसंख्य विदेशी नागरिकांसह एकूण २० जण ठार झाले होते. हा हल्ला आम्ही केला, असा दावा ‘इसिस’ने केला असला तरी बांगलादेश सरकारने मात्र याचा ठाम इन्कार करत आमच्या देशात ‘इसिस’ किंवा अल-कायदाचा अजिबात प्रभाव नाही, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ‘इसिस’ने जारी केलेल्या एका ताज्या व्हिडीओ संदेशात वरीलप्रमाणे धमकी दिली आहे. दहशतवादी संघटना व त्यांच्या कारवायांचा माग ठेवणाऱ्या अमेरिकेतील ‘एसआयटीई’ या वेबसाइटने ‘इसिस’चा हा व्हिडीओ पाहून त्याची माहिती जारी केली.
‘इसिस’ची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरियातील राक्का शहरात चित्रीकरण केलेल्या व्हिडीओत संदेश देणारा ‘इसिस’चा सशस्त्र ‘योद्धा’ बंगाली व इंग्रजी या भाषांमध्ये बोलणारा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीस ‘इसिस’ने अलीकडच्या काळात जे मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा दावा केला त्यापैकी पॅरिस, ब्रुसेल्स व अमेरिकेतील आॅरलँडो येथील हल्ल्यांनी झालेल्या विनाशाची छायाचित्रे पाहायला मिळतात. (वृत्तसंस्था)
गांभीर्याने घेतली दखल
ढाक्यातील हल्ला ‘इसिस’ने केलेला नव्हता हे आमचे म्हणणे कायम असले तरी या व्हिडीओनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
हा विषय आम्ही खूप गांभीर्याने घेतला असून आमचे संपूर्ण दल अथकपणे काम करीत आहे, असे बांगलादेशचे पोलीस उपमहानिरीक्षक शाहिदूर रहमान यांनी सांगितले.
‘इसिस’शी निष्ठा वाहिलेल्या जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश या बंदी घातलेल्या स्थानिक संघटनेने या हल्ल्यात मोठी भूमिका बजावली असावी, असेही पोलिसांना वाटते.
हल्ले पुन्हा पुन्हा होतच राहतील
व्हिडीओमध्ये बांगलादेश सरकार व तेथील नागरिकांना उद्देशून ‘इसिस’चा हा ‘योद्धा’ सांगतो की, धर्मशास्त्रावर चालणारे व अनेक देशांमध्ये पसरलेले असे इसिसचे राज्य स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या फार मोठ्या लढाईचा ढाक्यातील हल्ला हा केवळ एक भाग होता, हे बांगलादेशने पक्के समजून घ्यावे. तो हल्ला ही केवळ झलक होती... तुमचा पराभव करून आम्ही विजयी होईपर्यंत आणि जगभरात इसिसच्या राज्याची स्थापना होईपर्यंत असेच हल्ले पुन्हा पुन्हा होतच राहतील.
‘इसिस’चा बांगलादेशी ‘योद्धा’ : आज सुरू झालेला जिहाद हा इसिसच्या छत्रछायेखाली सुरू झाला आहे व त्याचे स्वरूप तुम्ही पूर्वी कधीही पाहिले नसेल असे असणार आहे, याचीही पक्की खुणगाठ बांगलादेश सरकारने बांधावी, असे हा व्हिडीओ सांगतो. गुप्तचर सूत्रांनी या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती अबू इसा अल-बंगाली या नावाने ओळखला जाणारा ‘इसिस’चा बांगलादेशी ‘योद्धा’ असल्याचे सांगितले.
झकीर नाईक एनआयएच्या रडारवर : बांगलादेशातील ढाका शहरात गेल्या आठवड्यात २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक झकीर नाईक यांच्या भाषणांची तपासणी एनआयए करीत आहे.