'या' देशात केवळ एकच कोरोना रूग्ण,संक्रमणाची साखळी तोडण्यात मोठं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:08 PM2020-05-26T15:08:40+5:302020-05-26T15:09:10+5:30
लॉकडाऊन देखील हटवण्यात आले असून हळूहळू येथील जनजीवन पूर्ववत होत आहे.
भारतात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवर कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न भेडसावत आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत नाहीत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. न्युझिलंडमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.
कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये समोर आले होते. पाहता-पाहता हा व्हायरस जगभरात पसरला. यामुळेच जगभरात लॉकडाउन घोषित करावे लागले आहे. कोरोना व्हायरस हा सगळ्यांचीच डोकेदुखी ठरत असताना असाही एक देश आहे, ज्याने कोरोनावर मात करत विजय मिळवला आहे. ५० लाख लोकसंख्या असणा-या या देशात आता केवळ एकच कोरोना रूग्ण आहे. 22 कोरोना रुग्ण खबरदारी म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. देशात 1500 प्रकरणं समोर आली होती आणि त्यापैकी 21 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान जेसिंडा यांनी 23 मार्चला एक महिन्याचा लॉकडाऊन जारी केला होता. त्यावेळी देशात फक्त 200 च्या आसपास प्रकरणं होती आणि कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. म्हणजे फक्त 4 आठवड्यांच्या कालावधीत देशातील संक्रमणाची साखळी तोडण्यात देशाला यश मिळालं. मे महिन्यात एकही नवीन कोरोना रूग्ण येथे आढळलेला नाही.
त्यामुळे लॉकडाऊन देखील हटवण्यात आले असून हळूहळू येथील जनजीवन पूर्ववत होत आहे. तरीही येथे काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लॉकडाऊनदरम्यान सीमा प्रतिबंध, क्वारंटाइन, आयसोलेशन, डिस्टन्सिंग आणि लोकांच्या वागण्यातील बदल यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात न्युझिलंड यशस्वी ठरले. त्यामुळेच न्युझिलंडचे उदाहरण जगभरात दिले जात आहे.