परिस्थिती बिकट! श्रीलंकेतील पेट्रोलपंपावर NO Petrol चे बोर्ड; दिवसातून 15 तास वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:09 PM2022-05-17T18:09:09+5:302022-05-17T18:13:29+5:30
श्रीलंकेतील अनेक पेट्रोल पंपावर "नो पेट्रोल"च्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. पेट्रोल मिळेल या आशेनं नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत.
श्रीलंका सध्या विविध प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. याच दरम्यान श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी एकच दिवस पुरेल इतका इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. यानंतर श्रीलंकेतील अनेक पेट्रोल पंपावर "नो पेट्रोल"चे बोर्ड लावण्यात आले आहेत. पेट्रोल मिळेल या आशेने नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. यासोबतच महागाईसह देशात अन्नधान्य़ाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात "देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक आहे. तेलाच्या तीन शिपमेंट आयात करण्यासाठी लागणारे डॉलर्सही सरकार जमा करू शकत नाही. तेलाची जहाजं पेमेंटसाठी कोलंबो बंदराबाहेर वाट पाहत आहेत" असं म्हटलं आहे. देशभरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर नो पेट्रोलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासांत देशातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
Sri Lanka | Fuel stations put up 'No Petrol' posters amid severe shortage of petrol-diesel
— ANI (@ANI) May 17, 2022
Petrol stocks only for a day, said PM Ranil Wickremesinghe y'day
We're waiting since early hours of day, but petrol is yet to come. People are waiting in kilometers-long queue, say locals pic.twitter.com/Mqn2VNu62W
श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात विक्रमी स्तरावर महागाई वाढली आहे. दिवसातून तब्बल 15 तास वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. अशात देशातील लाखो लोकांना अन्न, इंधन आणि औषधं पुरवण्यासाठीही सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
श्रीलंकन सरकारला खर्च चालवण्यासाठी 2.4 ट्रिलियन श्रीलंकन रुपयांची गरज आहे. मात्र सरकारला महसूल केवळ 1.6 ट्रिलियन इतका आहे. श्रीलंका संकटात सापडल्यापासून पहिल्यांदाच सरकारकडून सत्यता स्वीकारण्यात आली आहे. श्रीलंकेकडे असलेली परकीय गंगाजळी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करता येत नाही आहेत. श्रीलंकेची सरकारी एअरलाईन्स तोट्यात आहे. हा तोटा लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एअरलाईन्सचं लवकरच खासगीकरण करण्यात येईल, असं विक्रमसिंघे यांनी सांगितलं.