‘...तरच भारताशी चर्चा’
By admin | Published: August 31, 2015 11:08 PM2015-08-31T23:08:20+5:302015-09-01T00:25:39+5:30
द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
इस्लामाबाद : द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटले की, सीमेवर तणाव असतानाही रेंजर्सचे महासंचालक व सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. मात्र, जोपर्यंत सर्व द्विपक्षीय मुद्दे विषयपत्रिकेत घेतले जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तान भारताशी चर्चा सुरू करणार नाही. सर्व मुद्दे विषयपत्रिकेवर घेतल्याशिवाय पाक भारतासोबत पुन्हा चर्चा सुरू करणार नाही, असे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे.
एका खासगी टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अझीज म्हणाले की, भारताने पूर्वअटी घातल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा होऊ शकली नाही. ही चर्चा गेल्या आठवड्यात राजधानी नवी दिल्लीत होणार होती. सीमा आणि नियंत्रण रेषेवरील तणाव टिपेला गेल्याच्या पार्श्वभूमीवर अझीज यांनी ही भूमिका मांडली आहे. काश्मिरी फुटीरवाद्यांशी सल्लामसलतीची मुभा देण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकने गेल्या आठवड्यात अखेरच्या क्षणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द केली होती. मुख्यत्वे दहशतवादाच्या मुद्यावर चर्चेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीरचा विषय घुसडवल्याने भारतही नाराज होता.
भारत, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या रशियातील चर्चेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा स्तरावरील चर्चा घेण्याचा निर्णय झाला होता. (वृत्तसंस्था)