व्यापार युद्धावर अमेरिकेशी बोलण्यासाठी दरवाजे खुले - चीन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:50 AM2019-06-03T01:50:56+5:302019-06-03T01:51:25+5:30
अन्यथा अखेरपर्यंत लढा देण्याचाही दिला इशारा
सिंगापूर : अमेरिकेसोबत सुरू असलेले व्यापार युद्ध आणि दक्षिण चीन सागरावरून तणाव वाढत असताना चीनने चर्चेसाठी दरवाजे खुुले असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, अमेरिकेला खुमखुमी असेल, तर अखेरपर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचा इशाराही चीनने दिला.
आयआयएसएस शांग्री-ला परिसंवादात बोलताना चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगहे यांनी अमेरिकेसोबत चर्चेची तयारी दाखविताना अखेरपर्यंत लढा देण्याची तयारी दाखविली.
अमेरिका आणि चीनदरम्यान गेल्या एक वर्षापासून व्यापारावरून वाद चालू आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या उत्पादनांवर २५० अब्ज डॉलरचे शुल्क लावल्याने दोन्ही देशांदरम्यानचा तणाव अधिकच चिघळला आहे. मागच्या ५३९ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचलेली व्यापारी तूट चीनने कमी करावी, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे. बौद्धिक संपदा हक्काचे रक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि चिनी बाजारपेठेत अमेरिकी उत्पादनांना प्रवेश देण्यासाठी उपाय योजण्यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे.
अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापारी संघर्षाबाबत ते म्हणाले, अमेरिकेची चर्चा करण्याची इच्छा असेल, तर आमचे दरवाजे खुले आहेत. त्यांना खेटायचे असेल, तर आमचीही तयारी आहे. लष्करातील रेन झेंफेई हे जरी संस्थापक असले, तरी हुआवै ही लष्करी कंपनी नाही. रेंग झेंफेई यांनी लष्करात होते म्हणून ही कंपनीही लष्कराचा एक भाग आहे, असे समजणे उचित नाही.
विदेशी धोरणाच्या हिताविरुद्ध काम
अमेरिकेने हुआवै कंपनीला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून १६ मे रोजी बंदी यादीत टाकले आहे. यामुळे अमेरिकी कंपन्यांना हुआवै कंपनीच्या उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. हुआवै कंपनी राष्ट्रीय सुरक्षा आणि विदेशी धोरणाच्या हिताविरुद्ध काम करीत आहे, असा आरोप अमेरिकेच्या वाणिज्य खात्याने केला आहे.