जम्मू सियालकोट मार्ग उघडल्यास पाकिस्तानात जाणे सोपे होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 07:16 PM2016-03-12T19:16:46+5:302016-03-12T19:16:46+5:30
अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणो शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे
सुरेश डुग्गर
सुचेतगढ (जम्मू फ्रंटियर), दि. १२ - अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणे शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे. तो खुला व्हावा, असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी दरवेळी दोन देशांतील संबंध आडवे येतात.
जम्मूहून सियालकोट अंतर आहे केवळ 25 किलोमीटर अंतरावर आणि दोन्ही देशातील सीमा आहे तेथून 11 किलोमीटर अंतरावर. जम्मू-सियालकोट मार्गामध्येच दोन देशांतील सीमा आणि चौकी येते. स्वातंत्र्यापूर्वी येथून ये-जा सततच होत असे. पण 1947 साली दोन देश वेगळे झाले आणि श्रीनगर-रावळपिंडी मार्गाप्रमाणो हा मार्गही बंद झाला. जम्मू-सियालकोट सीमा ही कायम शांततेचे प्रतीक मानली गेली आहे. आतार्पयत येथून ना कधी अतिरेकी कारवाया झाल्या, ना कधी दोन देशांतील सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले.
श्रीनगर-मुझफ्फराबाद आणि पुंछ-रावळकोट मार्ग व्यापारासाठी का होईना, पण याआधी खुले झाले. मात्र जम्मू-सियालकोट मार्ग मात्र बंदच राहिला. हा मार्ग खुला व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री पै. मुफ्ती महमद सईद यांनी अनेकदा प्रयत्नही केला. पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. भारत आणि पाकिस्तान यांना जोडणारा हा मार्ग अतिशय चांगल्या स्थितीत आहे. भारतीय जकात चौकी आणि पाकिस्तानची पिली चौकी याच मार्गावर आहे आणि दोन्ही देशांतील सैन्यांच्या संयुक्त बैठका याच ठिकाणी होतात. त्यामुळे हा मार्ग खुला व्हावा, असे जम्मू-काश्मीरमधील जनतेला वाटते. हा मार्ग खुला झाला, तर त्यांना 20 तास प्रवास करून वाघा बॉर्डरवर जावे लागणार नाही. सध्या तोच मार्ग प्रवासासाठी खुला आहे.