बांगलादेशचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:59 IST2025-02-10T19:59:06+5:302025-02-10T19:59:59+5:30

Operation Devil Hunt in Bangladesh : 'ऑपरेशन डेव्हिल हंट' अंतर्गत तब्बल १,३०८ लोकांना अटक

Operation Devil Hunt crackdown in Bangladesh as 1308 arrested in nationwide sweep | बांगलादेशचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला, प्रकरण काय?

बांगलादेशचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला, प्रकरण काय?

Operation Devil Hunt in Bangladesh : इस्लाम धर्मात रमजानचा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. बांगलादेशमध्ये फेब्रुवारी अखेरीस सुरू होणाऱ्या रमजानपूर्वी देशातील समाजविघातक घटकांना चाप बसवण्याची मोहीम सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. बांगलादेश सरकारने काही निकषांच्या आधारे काही समाजविघातक घटकांना पकडण्यासाठी 'ऑपरेशन डेव्हिल हंट' सुरू केले आहे. या अंतर्गत समाजाला हानी पोहोचवणाऱ्यांना डेव्हिल म्हणजेच राक्षसी विचार असलेले लोक मानले जात असून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जात आहे.

शुक्रवारी रात्री गाजीपूरमध्ये विद्यार्थी आणि सामान्य लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशात ही कारवाई सुरू करण्यात आली. आतापर्यंत, बांगलादेशी सुरक्षा दलांनी या कारवाईद्वारे १,३०८ लोकांना अटक केली. पंतप्रधान मुहम्मद युनूस म्हणाले की, प्रशासनाने सर्व राक्षसी विचारांनी प्रेरित अशा घटकांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

ऑपरेशन डेव्हिल हंट म्हणजे काय?

अलिकडेच बांगलादेशमध्ये, बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाका येथील घरावर हल्लेखोरांनी हल्ला करून तोडफोड केली होती. या गोंधळात अनेक विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाले होते. या घटनेनंतरच मोहम्मद युनूस यांनी 'ऑपरेशन डेव्हिल हंट' सुरू करण्याचे निर्देश दिले. या ऑपरेशनचा उद्देश देशात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे असा आहे. याचबाबत बोलताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी म्हणाले की, या कारवाईद्वारे देशाच्या स्थिरतेसाठी धोका असलेल्या लोकांना ताब्यात घेतले जात आहे आणि सर्व वाईट घटकांना अटक करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. देशातील कायदा, सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सर्वांवर ही कारवाई केली जाणार आहे.

पोलिस, आर्मी सारेच ऑपरेशनचा भाग

कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत झालेल्या बैठकीत बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने ही कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या कारवाईत केवळ पोलिसच नाही तर बांगलादेश आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी), अन्सार आणि कोस्ट गार्डचे कर्मचारी देखील सहभागी आहेत.

 

Web Title: Operation Devil Hunt crackdown in Bangladesh as 1308 arrested in nationwide sweep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.