कसा होणार महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा अंत्यसंस्कार? लीक कागदपत्रांमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:46 PM2021-09-04T18:46:14+5:302021-09-04T18:47:06+5:30
योजनांनुसार, राणीचा मृतदेह संसदेत तीन दिवसांसाठी ठेवला जाईल. अधिकाऱ्यांनी अंदाज लावला की, तेव्हा मोठ्या संख्येने लोक लंडनमध्ये पोहोचतील.
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये त्यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये काय तयारी केली जाईल याचा उल्लेख आहे. असं सांगितलं जात आहे की, महाराणीच्या निधनानंतर यूकेमध्ये एक मोठं ऑपरेशन केलं जाईल. ज्यात दफन करण्याच्या प्रक्रियेपासून ते पोलीस व्यवस्था याचा आराखडा आहे. मात्र, बकिंघम पॅलेसकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, या योजनेला 'ऑपरेशन लंडन ब्रिज' असं कोडनेम देण्यात आलं आहे. यासंबंधी माहिती अमेरिकन न्यूज एजन्सी 'पॉलिटिको'च्या हाती लागली आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, क्वीनच्या निधनाचा दिवस अधिकारी 'डी-डे' म्हणून पाळतील. महाराणीला त्यांच्या निधनाच्या १० दिवसांनंतर दफन करण्याची योजना आहे. तेच त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स त्यांच्या दफनविधीआधी ब्रिटनचा दौरा करतील.
योजनांनुसार, राणीचा मृतदेह संसदेत तीन दिवसांसाठी ठेवला जाईल. अधिकाऱ्यांनी अंदाज लावला की, तेव्हा मोठ्या संख्येने लोक लंडनमध्ये पोहोचतील. यादरम्यान पोलीस व्यवस्था आणि जेवणाची कमतरता अशा समस्यांबाबतही चिंता आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारा दिवशी अभूतपूर्व गर्दी बघता मोठ्या संख्येने सुरक्षा तैनात केली जाईल.
एका मेमोत इशारा देण्यात आला आहे की, ब्रिटनच्या राजधानीमध्ये त्यावेळी लाखो संख्येने लोक पोहोचतील. पॉलिटिकानुसार, राणीच्या निधनानंतर नवीन राजा चार्ल्स ब्रिटनच्या चार राष्ट्रांचा दौरा करतील. असंही म्हटलं जात आहे की, ब्रिटिश पंतप्रधानांसोबतही याबाबत करार झाला आहे की राणीच्या अंत्यसंस्कारादिवशी राष्ट्रीय शोक केला जाईल. या दिवशी सुट्टी असेल. साल २०१७ मध्ये 'द गार्डियन' ने मोठा लेख प्रकाशित केला होता. ज्यात ऑपरेशन लंडन ब्रिजबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते.