लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:30 AM2019-11-19T11:30:21+5:302019-11-19T11:32:17+5:30
पोलिसांचे सहाय्य : सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांना सोशल मिडीयावरून समजली बातमी
बीड : नुकत्याच झालेल्या अवेळी पावसाने नुकसान झाल्यानंतर आपल्या वेदना मांडताना बीड तालुक्यातील उखंडा येथील पार्वती मारोती कदम यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्याच शब्दात लोकमतने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत भारतीय असलेले परंतु सध्या हाँगकाँगमध्ये असणारे सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांनी बीड पोलिसांमार्फत कदम कुटुंबाला ५० हजार रूपयांची मदत केली आहे. त्यांना ही बातमी सोशल मिडीयावरून समजली होती.
अवकाळी आणि कुठे मुसळधार तर कुठे अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकºयांच्या शासकीय मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ५१४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. दरम्यान लोकमतने थेट बांधावर जात पीडित शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. बीड शहरापासून १८ - २० किलोमीटर अंतरावर उखंडा- पिठ्ठी येथील कदम कुटुंबातील पार्वती आणि मारोती हे दाम्पत्य हताश दिसून आले. पावसाने भिजलेली बाजरीची कणसे घरासमोर आणि रस्त्यालगत वाळण्यास घातली होती. या रस्त्याने प्रवास करताना ही बाब लोकमत प्रतिनिधी व छायाचित्रकाराच्या निदर्शनास आली तोच दुचाकी थांबवून पार्वती कदम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ‘शेतात पिकंना, पिकलं तर पाऊस खाऊ देईना, रानात पसाभरही आलं नाही. लेकरांनी काय खायचं? लई वाटोळं झालं. असं वाटतं मरु तर बरं पण मरण येत नाय’ अशी कैफियत पार्वती कदम यांनी मांडली होती. या संदर्भात १७ नोव्हेंबरच्या अंकात लोकमतने ‘असं वाटतं मरु तर बरं, पण मी मरायची नाय..’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. लोकमत आॅनलाईनद्वारे लिंक शेअर केली होती. सोशल मिडीयावरही दिवसभर ही बातमी वाचणारे आपल्या संबंधित मित्रांच्या ग्रुपवर पोस्ट करत होते. बातमीला लाईक करतानाच दातृत्वाचा भाव जागा होत होता. वाचताना मन हेलावल्याचे राज्यातील अनेक वाचकांनी बीड कार्यालयात प्रस्तुत प्रतिनिधीशी फोनद्वारे संपर्क करुन सांगतानाचा मदतीची भावना व्यक्त केली. तर सोशल मिडियावर ही बातमी वाचून सध्या हॉँगकॉँगमध्ये असणारे सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांनी त्यांच्या परिचितांशी संपर्क करत बीड पोलिसांमार्फत पार्वती मारोती कदम यांच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत केली. पाटील हे भारतीय रहिवासी असून ६ महिन्यांपासून हॉँगकॉगमध्ये ते राहतात.
लोकमतच्या बातमीची दखल घेऊन कदम दाम्पत्याला ५० हजारांची मदत
दरम्यान ठाणे येथील स्वामी फाऊंडेशनचे महेश कदम, उमरग्याचे विनायक पाटील, बारामतीचे अॅड. नितीन भामे यांच्यासह अनेकांनी मानवतेच्या दृष्टीतून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.