चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:09 AM2022-10-27T11:09:38+5:302022-10-27T11:12:01+5:30

चीनी नियामकांनी सप्टेंबरमध्ये या लसीला बूस्टर म्हणून वापरण्यासाठी मान्यता दिली. ही लस चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंकने विकसित केली आहे.

Oral Covid Vaccine Dose Now in China; Testing in other countries too | चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी

चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी

googlenewsNext

बीजिंग: चीनमध्ये शांघाय शहरात बुधवारी 'सुई-मुक्त' तोंडावाटे कोविड विरोधी लस देण्यास सुरुवात करण्यात आली. ही जगातील पहिली अँटी- कोविड लस असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये याविषयीची माहिती देण्यात आली आहे. ही लस तोंडाने घेतली जाते आणि ज्यांना आधीच लसीकरण केले गेले आहे त्यांना बूस्टर डोस म्हणून ती विनामूल्य दिली जात आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनी नियामकांनी सप्टेंबरमध्ये या लसीला बूस्टर म्हणून वापरण्यासाठी मान्यता दिली. ही लस चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंकने विकसित केली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तोंडावाटे घेतलेली लसदेखील श्वसन प्रणालीच्या उर्वरित भागात पोहोचण्यापूर्वी विषाणू थांबवू शकते. 'सुई-मुक्त' लसींमुळे कमकुवत आरोग्य प्रणाली असलेल्या देशांमध्ये लसीकरण अधिक सुलभ होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. 

ही लस वापरणे सोपे आहे. ज्यांना सुईद्वारे लस घेणे आवडत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धती सोपी आहे. यामुळे गरीब देशांमध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात मदत होईल. कोविड १९  महामारीचे निर्बंध शिथिल होण्याआधी देशातील जास्तीत जास्त नागरिकांना बूस्टर लसीचा डोस मिळावा यासाठी चीनचे प्रयत्न आहेत. कोविड महामारीमुळे चीनची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चीनमधील सरकारी ऑनलाइन मीडिया इन्स्टिट्यूटने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लोक सामुदायिक आरोग्य केंद्रात अर्धपारदर्शक कपमधून नोझलद्वारे तोंडावाटे ही लस घेताना दिसतात. लस घेण्याची प्रक्रिया २० सेकंदाची आहे. या व्हिडिओत शांघायमधील एका रहिवाशाने म्हटले आहे की, "हे एक कपभर दूध चहा पिण्यासारखे होते. जेव्हा मी श्वास घेतला, तेव्हा त्याची चव थोडी गोड लागली.' जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात अशा सुमारे डझनभर लसींची चाचणी केली जात आहे. चीनमध्ये बुधवारी अधिकाऱ्यांनी ९,००,००० लोकांना वुहानमध्ये किमान पाच दिवस प्रवास करण्यास मनाई केली. २०१९ च्या उत्तरार्धात वुहान शहरातूनच हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता.

अन्य देशांतही चाचणी
अशा लसीची चीन, हंगेरी, पाकिस्तान, मलेशिया, अर्जेंटिना आणि मेक्सिकोमध्ये क्लिनिकल चाचणी झाली आहे. मलेशियामध्ये अशा लसींच्या क्लिनिकल चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे. भारतातही अशा लसीला मान्यता दिली आहे, परंतु तिचा वापर अद्याप सुरू झालेली नाही. यूएस-विकसित आणि भारतीय लस उत्पादक भारत बायोटेकला परवाना देण्यात आला आहे. ही लस नाकात स्प्रे म्हणून वापरली जाते.

Web Title: Oral Covid Vaccine Dose Now in China; Testing in other countries too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.