Oscars Award 2023 : अँकरला चापट मारण्यापासून ते बळजबरीने चुंबन घेण्यापर्यंत...जाणून घ्या Oscar अवॉर्डमधील 5 मोठे वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:58 PM2023-03-13T13:58:01+5:302023-03-13T15:07:35+5:30
Oscars 2023: ऑस्कर पुरस्कारांवर अख्या जगाच्या नजरा लागलेल्या असतात. परंतू, अनेकदा या प्रतिष्ठित पुरस्कारामध्येही मोठे वाद झाले आहेत.
Oscars 2023: आज अमेरिकेत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. या पुरस्काराला सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी मानले जाते. ऑस्कर पुरस्कार मिळवणे हे जगातील प्रत्येक चित्रपट निर्मात्याचे स्वप्न असते. त्यामुळे या पुरस्कारांकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. मात्र, अनेकवेळा ऑस्कर पुरस्कारही वादात सापडला आहे. ऑस्करच्या मंचावर चुंबन घेण्यापासून ते कानाखाली चापट मारण्यापर्यंत अनेक वाद झाले आहेत. जाणून घेऊया ऑस्कर अवॉर्डचे 5 मोठे वाद.
मार्लन ब्रँडोने ऑस्कर नाकारला
1973 मध्ये 'द गॉडफादर' या चित्रपटासाठी मार्लन ब्रँडोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. पण मार्लनने हा पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या जागी नेटिव्ह अमेरिकन अॅक्टिव्हिस्ट सेचिन लिटलफेदर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. यादरम्यान सेचिनने सांगितले होते की, हॉलिवूडमध्ये नेटिव्ह अमेरिकन लोकांची प्रतिमा दाखवण्यात आल्याने मार्लन नाराज आहेत आणि यामुळेच त्यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. या प्रकरणावरुन बराच वाद झाला होता.
अँजेलिनाच्या चुंबनावरही वाद झाला
अँजेलिना जोलीला तिच्या 'गर्ल इंटरप्टेड' चित्रपटासाठी 2000 साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर ट्रॉफी मिळाल्यानंतर अँजेलिना तिच्या भावाला किस करताना दिसली होती, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हा वाद वाढल्यावर अँजेलिनाचा भाऊ जेम्स याला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
अॅड्रिन ब्रॉडीने हॅले बेरीचे चुंबन घेतले
अॅड्रिन ब्रॉडी यांना 2003 च्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'द पियानोवादक' चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अॅड्रियनला ट्रॉफी देण्यासाठी हॅले बेरी स्टेजवर आली होती. यादरम्यान अॅड्रियनने स्टेजवरच हॅले बेरीचे चुंबन घेतले. यावरून बराच वाद झाला होता. नंतर, हे सर्व पूर्वनियोजित नव्हते, असे अॅड्रियनने स्पष्ट केले.
'ला ला लँड'बाबत चुकीची घोषणा झाली
2017 मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठी चूक झाली होती, ज्यावरून बराच वाद झाला होता. सोहळ्यादरम्यान 'ला ला लँड' या चित्रपटाचे नाव चुकून सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी जाहीर करण्यात आले. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर उपस्थितांच्या हातात चुकीचे नाव असलेला लिफाफा गेल्याची घोषणा मंचावरून करण्यात आली. त्या वर्षी 'मूनलाईट' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता.
ख्रिस रॉकला विल स्मिथने चापट मारली
2022 चा ऑस्कर पुरस्कारही मोठ्या वादात सापडला होता. स्टेजवर क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली. यामुळे संतापलेल्या स्मिथने स्टेजवरच क्रिस रॉकला थप्पड मारली. या प्रकरणाने मोठा वाद झाला होता. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. चूक लक्षात आल्यावर विल स्मिथने ख्रिसची माफीही मागितली.