Oscars 2018: ऑस्करचा 'चौकार' मारणाऱ्या 'शेप ऑफ वॉटर'ची आगळीवेगळी कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 11:21 AM2018-03-05T11:21:03+5:302018-03-05T12:20:06+5:30
शेप ऑफ वॉटरला ऑस्करच्या एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती.
कॅलिफोर्निया: जगभरातील चित्रपटप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेला 90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी कॅलिफोर्नियात पार पडला. या सोहळ्यात बहुचर्चित 'शेप ऑफ वॉटर'ने यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर आणि प्रॉडक्शन डिझाईन या विभागांमध्येही 'शेप वॉटरला ऑस्कर'ने गौरवण्यात आले.
शेप ऑफ वॉटरला ऑस्करच्या एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती. यापूर्वी 'ऑल अबाउट इव', 'टायटॅनिक' आणि 'ला ला लँड' या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली होती. मात्र, 'शेप ऑफ वॉटर'ने हे विक्रम मोडीत काढल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. मेक्सिकन दिग्दर्शक गिलिआर्मो डेल टोरो यांनी 'शेप ऑफ वॉटर'चे दिग्दर्शन केले आहे.
एका अमेरिकन प्रयोगशाळेत काम करणारी कर्मचारी आणि अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला विचित्र प्राणी या दोन मुख्य पात्रांभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला हा प्राणी माणसासारखाच चालू शकतो. पण पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असतो. सफाईच्या निमित्ताने या द्विपाद प्राण्याशी हातवाऱ्यांच्या भाषेत ओळख करून घेणारी एलिसा त्याच्याशी मैत्री करते आणि या मैत्रीमुळे तिचे आयुष्य बदलून जाते. प्रयोगशाळेचा निर्दयी मालक रिचर्ड (मायकेल शेनॉन) त्या प्राण्याला मारून टाकण्याच्या कामाला लागतो. तेव्हा एलिसा आपल्या मित्राच्या मदतीने त्याला घरी पळवून आणते आणि त्यानंतरच्या एकंदरीत घटनाक्रमाचे चित्रीकरण 'शेप ऑफ वॉटर'मध्ये करण्यात आले आहे. वेगळी मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे हा फॅण्टसीपट यंदा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, ऑस्कर नामांकनांची यादी जाहीर झाल्यानंतर या चित्रपटावर कथाचोरीचे आरोप झाले होते. परंतु, या सगळ्यावर मात करत 'शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला.
JUST IN: “The Shape of Water” wins the #Oscar for Best Picture. https://t.co/KyJELjJlTS#Oscarspic.twitter.com/TxGA3fyQA7
— ABC News (@ABC) March 5, 2018