...नाहीतर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू, चीनचा भारताला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 11:22 AM2017-07-10T11:22:16+5:302017-07-10T11:23:16+5:30
जो तर्क लावत भारतीय सैन्यांनी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवला आहे, त्याच तर्काच्या आधारे आम्ही काश्मीरमध्ये घुसू असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 10 - जो तर्क लावत भारतीय सैन्यांनी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवला आहे, त्याच तर्काच्या आधारे आम्ही काश्मीरमध्ये घुसू असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. डोकलाममध्ये भारतीय सैन्यांनी तळ ठोकला असल्याने चीनचा तिळपापड झाला असून त्यांच्याकडून अनेक दावे केले जात आहेत. चीन डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न करत असून भारताने याला विरोध केला आहे. हा रस्ता बांधला गेल्यास सिक्कीमसहित तिबेट आणि भूतानशी जोडला जाईल ज्यामुळे भारताला धोका वाढतो.
आणखी वाचा
"जरी भूतानने आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी भारताची मदत मागितली असली, तरी ती मर्यादित असली पाहिजे. वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवायची गरज नाही", असं चीनच्या वेस्ट नॉर्मल यूनिव्हर्सिटीमधील भारताच्या अध्ययन विभागाचे प्राध्यापक आणि व्यवस्थापक लॉन्ग शिंगचून बोलले आहेत. "नाहीतर याच तर्काच्या आधारे जर पाकिस्तान सरकारने आम्हाला विनंती केली तर दिस-या देशाचं सैन्य भारत आणि पाकिस्तानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवेल. यामध्ये भारत नियंत्रित काश्मीरचाही समावेश असेल" असा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.
लॉन्ग शिंगचून यांनी चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये यासंबंधी लेख लिहिला आहे. पाश्चिमात्य देशांचं भारताला समर्थन असलं तरी डोकलामचा वाद आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ शकतो. कारण पाश्चिमात्य देशांना आमच्यासोबत व्यवसाय करायचा आहे असंही लिहण्यात आलं आहे.
चीन फक्त हस्तक्षेप करत असून, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारत आहे. मुख्य म्हणजे या भागावर भारत आणि पाकिस्तान दोघांनीही दावा केलेला आहे. मात्र लेखात हा मुद्दा मांडण्यात आलेला नाही.
"आपली बाजू भक्कम असल्याचे पुरावे चीनकडे असून गरज पडल्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद किंवा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडू शकतो", असंही लॉन्ग शिंगचून बोलले आहेत. याचवेळी त्यांनी पाश्चिमात्य देश भारताच्या वर्चस्व करण्याचा प्रयत्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.
"भारतीय मोठ्या प्रमाणात नेपाळ आणि भुटानमध्ये वास्तव्यासाठी गेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी सिक्कीमप्राणे भारताचं राज्य होऊ नये हे नेपाळ आणि भूतानसमोरील आव्हान आहे", असंही लेखातून सांगण्यात आलं आहे.
सिक्किम सेक्टरमधील जवळपास 10 हजार फूट उंचीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. भारतीय सैन्याने मागे हटावे, यासाठी चीनकडून वारंवार इशारे देण्यात आले आहेत. मात्र तरीही भारतीय सैन्याचे जवान सिक्किम सेक्टरमध्ये पाय रोवून उभे आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 10 हजार फुट उंच या वादग्रस्त भागात तंबू गाडले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तेथून सरकणार नाही, तोपर्यंत आपणही माघार घेणार नाही असा संकल्प या सैनिकांनी घेतला आहे. याशिवाय डोक्लाममधील भारतीय सैन्याला अविरतपणे रसद पुरवठा केला जात असल्याचंही वृत्त आहे. म्हणजेच भारतीय लष्करावर चीनच्या इशारा आणि धमक्यांचा काहीच दबाव नाही याचे हे स्पष्ट संकेत आहेत.