...अन्यथा जगावर ओढवेल अन्नसंकट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी-२० शिखर परिषदेत महासत्तांना शांततेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 07:18 AM2022-11-16T07:18:11+5:302022-11-16T07:18:48+5:30
G20 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नका, युक्रेन वाद मुत्सद्देगिरीने सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जागतिक महासत्तांना केले.
बाली (इंडोनेशिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नका, युक्रेन वाद मुत्सद्देगिरीने सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जागतिक महासत्तांना केले. ते जी-२० शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करत होते. आजचे खत संकट उद्या अन्न संकटात बदलू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
खते आणि अन्नधान्य या दोन्हींची पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यासाठी संयुक्त करार करण्यावरही त्यांनी भर दिला. वार्षिक जी-२० शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक महामारी कोविड-१९ दरम्यान देशातील १.३ अब्ज नागरिकांची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांनादेखील अधोरेखित केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियन तेल आणि वायू विकत घेण्याच्या विरोधात पाश्चिमात्य देशांनी केलेल्या आवाहनादरम्यान पंतप्रधानांनी ऊर्जा पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध न ठेवण्याचे आवाहन केले.
हवामानबदल, कोविड-१९ जागतिक महामारी आणि युक्रेनच्या संकटामुळे निर्माण झालेली जागतिक आव्हाने यांनी जग उद्ध्वस्त केले आहे. जागतिक पुरवठा साखळी खिळखिळी झाली आहे. आजचे खत संकट उद्या अन्न संकटात बदलू शकते, त्यामुळे जगाला त्यावर उपाय शोधावा लागेल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
युद्धविरामाचा मार्ग शोधा
पंतप्रधान म्हणाले की, युक्रेनमध्ये युद्धविरामाचा मार्ग शोधावा लागेल. गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धाने हाहाकार माजविला. नंतरच्या काळात नेत्यांनी शांततेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला. जगात शांतता, सौहार्द आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस व सामूहिक संकल्प ही काळाची गरज आहे. मला खात्री आहे की पुढच्या वर्षी गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींच्या भूमीवर जेव्हा जी-२०ची बैठक होईल तेव्हा आपण सर्व मिळून जगाला शांततेचा ठोस संदेश देऊ शकू.
मोदी-ऋषी सुनक यांची पहिल्यांदाच भेट
जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी प्रथमच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट ठरली. तत्पूर्वी, ऑक्टोबरमध्ये, पीएम मोदी आणि सुनक यांनी फोनवर बोलले आणि दोन्ही देशांमधील संतुलित आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार कराराच्या लवकर निष्कर्षाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला होता.
अन् बायडेन यांनी मोदींना मारली हाक
परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी व्यासपीठावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः मोदींना भेटायला आले. प्रत्यक्षात बायडेन मोदींच्या दृष्टीपलीकडे होते. परंतु अचानक बायडेन पाठीमागून आले आणि त्यांनी मोदींना आवाज दिला. मोदींनी त्यांच्याकडे पाहिले आणि दोघांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दोघांनी जवळ येत भेट घेतली.